कोर्टाच्या आदेशानुसार मुरदाळा येथे 5 एकर वनजमिनीवरील अतिक्रमण हटवले; 200 वृक्षांची लागवड
गोंदिया | प्रतिनिधी
वनपरिक्षेत्र गोंदिया अंतर्गत सहवन क्षेत्र तासगावच्या दवणीवाडा बीटातील मुरडाळा येथे न्यायालयाच्या आदेशानुसार वन विभागाने मोठी कारवाई करत सुमारे 5 एकर वनजमिनीवरील अतिक्रमण हटवून त्या ठिकाणी 200 वृक्षांची लागवड केली. ही कारवाई 11 जुलै रोजी सकाळपासून सायंकाळपर्यंत शांततेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली.
मिळालेल्या माहितीनुसार, यशोदा नागो लिल्हारे (रा. मुरडाळा) यांच्या ताब्यात असलेल्या गट क्रमांक 235 व 236 मधील सुमारे पाच एकर वनजमिनीवरील अतिक्रमण न्यायालयाच्या आदेशानुसार हटविण्यात आले. अतिक्रमण हटविल्यानंतर वन विभागाने तत्काळ त्या जागेवर 200 विविध प्रजातींच्या वृक्षांचे रोपण करून वनसंवर्धनाचा महत्त्वपूर्ण उपक्रमही राबविला.
सदर कारवाई उपवनसंरक्षक पवन कुमार जोंग यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी सहाय्यक वनसंरक्षक विजय धांडे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत हुमणे तसेच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी दवणीवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत भुते यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याशिवाय ग्रामपंचायत मुरडाळा तसेच संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनीही या कारवाईस सहकार्य केले.
वन विभागाने न्यायालयाच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करत वनजमिनीचे संरक्षण करण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने वृक्षारोपणाचा उपक्रम राबविल्यामुळे या कारवाईचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. अतिक्रमणमुक्त करण्यात आलेली वनजमीन भविष्यात वनक्षेत्राच्या विकासासाठी आणि जैवविविधतेच्या संवर्धनासाठी उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास वन विभागाने व्यक्त केला आहे.
वनसंपत्तीचे संरक्षण, न्यायालयीन आदेशांची प्रभावी अंमलबजावणी आणि पर्यावरण संवर्धन या तिन्ही बाबींचा समतोल साधणारी ही कारवाई वन विभागासाठी उल्लेखनीय ठरली असून, भविष्यातही अशाच प्रकारे वनजमिनीवरील अतिक्रमणाविरोधात कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत या निमित्ताने मिळाले आहेत.
