General

महामार्गावरच व्यवसायाचा थाट; प्रवाशांच्या सुरक्षेशी खेळ

नागरा/गोंदिया : – राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने ट्रॅक्टर उभा करून भरदिवसा नर्सरी व्यवसाय केला जात असल्याचे चित्र नागरा परिसरात पाहायला मिळत आहे. व्यवसायातून अर्थार्जन करण्यासाठी महामार्गाच्या वापराचा मनमानी पद्धतीने केला जात असताना दुसरीकडे या प्रकारामुळे सामान्य प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

नागरा येथील राष्ट्रीय महामार्गालगत काही नर्सरी व्यावसायिकांनी रस्त्याच्या अगदी जवळ ट्रॅक्टर उभे करून झाडे, रोपे व इतर साहित्याची विक्री सुरू केली आहे. अनेकदा ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला न राहता वाहतुकीच्या मार्गात येईल अशा पद्धतीने उभे केले जात असल्याने वाहनचालकांना अचानक मार्ग बदलावा लागतो. विशेषतः भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांसाठी ही परिस्थिती धोकादायक ठरू शकते.

एकेकाळी वाहतुकीसाठी पुरेसे रस्ते उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. आता रस्ते रुंद व व्यवस्थित झाले असताना त्याच रस्त्याच्या कडांचा आणि काही ठिकाणी वाहतुकीच्या मार्गाचाच व्यावसायिक वापर सुरू झाल्याचे चित्र आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे व्यावसायिकांना रस्त्याचा वापर आपल्या सोयीनुसार करण्याचे धाडस मिळत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

फुलचूर नाका परिसरातही धोकादायक परिस्थिती

नागरा परिसरापुरतेच हे चित्र मर्यादित नसून फुलचूर नाका परिसरातही रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठमोठे ट्रक उभे केले जात असल्याचे दिसून येते. यामुळे आधीच वाहतुकीवर परिणाम होत असताना रस्त्यावर पाळीव जनावरांची मोठी संख्या वावरत असल्याने वाहनचालकांसमोर आणखी एक धोका निर्माण झाला आहे.

एकीकडे अवैध पार्किंग, दुसरीकडे रस्त्यालगतचे व्यवसाय आणि त्यातच महामार्गावर फिरणारी जनावरे यामुळे या परिसरातील वाहतूक व्यवस्था धोकादायक बनली आहे. या सर्व प्रकारांकडे स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?

महामार्गावर दररोज विविध वेळेला अशा प्रकारे अडथळे निर्माण होत असताना संबंधित विभागांकडून ठोस कारवाई का केली जात नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. एखादा गंभीर अपघात घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल प्रवाशांकडून केला जात आहे.

राष्ट्रीय महामार्ग हा व्यवसायासाठी नव्हे, तर सुरक्षित आणि सुरळीत वाहतुकीसाठी आहे. त्यामुळे रस्त्यावर अडथळा निर्माण करणारे ट्रॅक्टर, अवैध पार्किंग करणारे ट्रक तसेच वाहतुकीला धोका निर्माण करणाऱ्या जनावरांबाबत संबंधित प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची, हा प्रश्न अनुत्तरितच राहणार आहे.