General

बसस्थानक परिसरात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात

गोंदिया : – शहरातील मरारटोली परिसरातील मुख्य बसस्थानकाजवळ उड्डाणपुलाच्या निर्मितीचे काम सुरू असल्याने या भागात वाहतूक आणि प्रवाशांची मोठी वर्दळ निर्माण झाली आहे. एकाच वेळी शेकडो प्रवासी या मार्गावरून ये-जा करत असल्याने परिसरात वारंवार वाहतूक कोंडी आणि गर्दीचा सामना करावा लागत आहे. त्यातच रस्त्याच्या कडेला असलेली व्यावसायिक दुकाने, अनधिकृतपणे पार्क केलेली वाहने आणि गर्दीचा गैरफायदा घेणाऱ्या काही समाजकंटकांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

या परिसरात रस्त्यावर एक इसम अस्वस्थ अवस्थेत पडलेला आढळून आल्याने परिस्थितीचे गांभीर्य पुन्हा एकदा समोर आले. गर्दीच्या आणि वाहनांच्या सतत वर्दळीच्या ठिकाणी एखादा व्यक्ती अशा अवस्थेत रस्त्यावर पडून राहणे धोकादायक आहे. त्याचवेळी एखाद्या वाहनाची धडक बसल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, एवढ्या संवेदनशील परिसरात नागरिकांच्या मदतीसाठी किंवा वाहतूक नियंत्रणासाठी प्रशासनाचे कर्मचारी तत्काळ उपलब्ध नसल्याची स्थिती दिसून येत आहे.

उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने रस्त्यांची उपलब्ध जागा कमी झाली आहे. त्यातच रस्त्याच्या कडेला होणारे अनधिकृत पार्किंग आणि दुकानांमुळे प्रवाशांना तसेच वाहनचालकांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. बसस्थानक परिसरात ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असल्याने महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच या गर्दीचा त्रास सहन करावा लागत आहे.

सार्वजनिक ठिकाणी कायदा-सुव्यवस्था आणि वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी असताना प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळीच चित्र दाखवत आहे. विकासकामांच्या माध्यमातून शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न होत असला तरी त्या विकासकामांच्या काळात नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असेल, तर या विकासाचा उपयोग काय, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

मरारटोली बसस्थानक परिसर हा शहरातील अत्यंत संवेदनशील आणि वर्दळीचा भाग असल्याने येथे नियमित वाहतूक पोलिसांची नियुक्ती, अनधिकृत पार्किंगवर कारवाई, रस्त्यावरील अडथळे हटविणे आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा एखादी गंभीर दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी तातडीने दखल घेऊन या परिसरातील वाहतूक व सुरक्षेची व्यवस्था सुधारावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.