वडेगाव येथे घरात घुसून रानडुकराचा महिलेवर हल्ला; महिला गंभीर जखमी
तालुका प्रतिनिधी तिरोडा :- तालुक्यातील वडेगाव येथे 21 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास रानडुकराने घरात शिरून हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वडेगाव येथील रहिवासी छायाताई हेमराज बडगे, वय 65 वर्षे ह्या आपल्या घरात घरगुती काम करीत असताना अचानक जंगलाकडून आलेले रानडुक्कर थेट घरात घुसले. त्याने छायाताई यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. रानडुकराने त्यांच्या डोक्याला आणि अंगाला गंभीर दुखापत केली. घरातून आरडाओरड ऐकू येताच शेजारी आणि कुटुंबीय धावत आले व त्यांनी कसेबसे रानडुकराला हुसकावून लावले आणि महिलेला वाचवले.
रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या महिलेला तातडीने तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे . तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
गावात दहशतीचे वातावरण –
या घटनेनंतर वडेगावसह आजूबाजूच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, गेल्या काही दिवसांपासून सायंकाळ होताच रानडुक्कर, नीलगाय आणि इतर वन्य प्राणी शेतातून थेट गावात घुसत आहेत. यापूर्वीही शेतातील पिकांचे नुकसान केले आहे, पण थेट घरात घुसून माणसावर हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
ग्रामस्थांनी वन विभागाकडे मागणी केली आहे की, गावात तातडीने गस्त पथक पाठवावे, रानडुकरांचा बंदोबस्त करावा आणि जखमी महिलेच्या कुटुंबाला शासनाच्या नियमानुसार तात्काळ आर्थिक मदत व नुकसान भरपाई द्यावी.
याबाबत वन विभागाला माहिती देण्यात आली असून पुढील कारवाई सुरू आहे.
