General

रावणवाडी परिसरात अवैध मुरूम उत्खनन; प्रशासनाला दररोज लाखोंचा फटका

गोंदिया :- तालुक्यातील रावणवाडी परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या मुरूम उत्खननामुळे शासनाच्या महसुलाला दररोज लाखो रुपयांचा फटका बसत असल्याचे गंभीर चित्र समोर येत आहे. परिसरातील उमरी, बगोली आदी भागांमध्ये भरदिवसा तसेच रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात मुरूमाचे उत्खनन करून त्याची सर्रास वाहतूक केली जात असल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळत आहे.

विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकाराची माहिती संबंधित महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी तसेच तहसीलदार यांना नियमितपणे दिली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, तरीदेखील अवैध उत्खननावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

स्थानिकांच्या माहितीनुसार, उत्खननासाठी जेसीबी आणि मोठ्या डंपरांचा वापर केला जात असून रात्रीच्या अंधारात मुरूमाची वाहतूक केली जाते. त्यामुळे परिसरातील रस्त्यांची दुरवस्था होत असून धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. तसेच अवैध उत्खननामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी करूनही संबंधितांवर कारवाई होत नसल्यामुळे अवैध मुरूम माफियांना अभय मिळत असल्याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे. शासनाचा महसूल बुडवून काही जण आर्थिक फायदा घेत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून अवैध उत्खनन तात्काळ बंद करावे तसेच संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता परिसरातील नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.