पवनी तालुक्यात भेसळीचा गोरखधंदा जोमात
अन्न व औषध प्रशासनाच्या ‘कुंभकर्णी’ झोपेवर नागरिकांचा तीव्र संताप!
अमित रणदिवे/भंडारा:-
“अंधेरी रातो में, सुनसान राहो पर, हर जुर्म मिटाने को, जब एक मसीहा निकलता है, उसे लोग शहंशाह कहते है…” हा प्रसिद्ध फिल्मी संवाद सध्या भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात एका वेगळ्या आणि अत्यंत गंभीर संदर्भाने चर्चेत आला आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील गावांमध्ये सुरू असलेल्या अन्नपदार्थांच्या भयानक आणि जीवघेण्या भेसळीला आळा घालण्यासाठी आता तुकाराम मुंडेसारखा एखादा डॅशिंग किंवा ‘सिंघम’ स्टाईल अधिकारी कधी येणार? आणि या भेसळखोर माफियांवर कठोर कारवाई कधी होणार? अशी आर्त हाक सध्या सर्वसामान्य ग्राहकांमधून ऐकायला मिळत आहे.
एकिकडे सर्वसामान्यांच्या जिवाशी खेळणारे भेसळ बहाद्दर मोकाट असून, नामानिराळे राहत गब्बर होत आहेत. तर दुसरीकडे अन्न व औषध प्रशासन या गंभीर समस्येकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून कुंभकर्णी झोपेत असल्याचा थेट आरोप होत आहे. तालुक्यात सध्या “आंधळा दळतोय आणि कुत्रा पीठ खातोय”, अशीच काहीशी दयनीय अवस्था पाहायला मिळत असून, संबंधित अधिकारी आणि भेसळ करणाऱ्यांचे आर्थिक ‘साटेलोटे’ असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे.
मध्यरात्रीच्या अंधारात चालतो ‘गोरखधंदा’
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, या भेसळयुक्त सामानाची देवाणघेवाण आणि वाहतूक दिवसा न होता मध्यरात्रीच्या अंधारात केली जाते. अन्न व औषध प्रशासनाच्या डोळेझाकपणामुळे हा आरोग्याशी खेळणारा कारभार केवळ ‘अर्थपूर्ण’ संबंधांमुळे तर सुरू नाही ना? असा थेट प्रश्न आता जनतेकडून विचारला जात आहे.
पाकीट बंद दुधाचे ‘केमिकल’ कनेक्शन?, गृहिणी चिंतेत
भंडारा जिल्ह्यातील पवनी, आसगाव, कोंढा, कोसरा आणि अड्याळ परिसरातील काही दुकानांमध्ये मिळणारे पाकीटमधील दूध अनेक दिवस खराब का होत नाही? हा प्रश्न आता प्रत्येक गृहिणीला पडू लागला आहे. नैसर्गिक दूध अवघ्या काही तासांत खराब होते, मग हे पाकीटबंद दूध कित्येक दिवस टिकवण्यासाठी त्यात कोणते आरोग्याला घातक केमिकल मिसळले जाते? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. बाजारात काही नावाजलेल्या कंपन्यांच्या नावाखाली या भेसळयुक्त दुधाची सर्रास विक्री होत आहे. पनीर बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात शुद्ध दूध लागते आणि त्याचा उत्पादन खर्चही जास्त असतो. असे असतानाही बाजारात अनेकदा अतिशय कमी दरात पनीर उपलब्ध होत असल्यामुळे, बाजारात मोठ्या प्रमाणावर ‘सिंथेटिक पनीर’ विकले जात असल्याची चर्चा आहे.
तसेच पवनी तालुक्यातील काही तेलघाण्यातून तेल खरेदी करून त्यात स्वस्त व भेसळयुक्त तेल मिसळले जाते. त्यानंतर नामांकित कंपन्यांचे बनावट लेबल लावून हे टीन किराणा दुकानदारांना विक्रीसाठी पाठविले जात असल्याची माहिती समोर आली असून काही पानटपऱ्यांवर सडलेली सुपारी आणि शासनाने प्रतिबंधित केलेली सुगंधी तंबाखू कोणतीही भीती न बाळगता खुलेआम विकली जात आहे.याशिवाय दैनंदिन वापरातील कडधान्य, मसाले आणि फळ मार्केटमध्येही मोठ्या प्रमाणावर भेसळ करून ग्राहकांच्या खिशाला आणि आरोग्याला कात्री लावली जात आहे.
तीव्र आंदोलनाचा इशारा
सर्वसामान्यांच्या जिवाशी चाललेला हा खेळ आता अजिबात खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा ग्राहक परिषदेने दिला आहे. अन्न व औषध प्रशासनाने तात्काळ जागे होऊन अड्याळ आणि पवनी परिसरातील संशयास्पद दूध पॉकेट, कडधान्य, अन्नपदार्थ व फळ विक्रेते, तेल माफिया आणि पानटपऱ्यांची कसून चौकशी करावी व दोषींवर थेट गुन्हे दाखल करावेत, अन्यथा ग्राहक परिषदेतर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा कडक इशारा देण्यात आला आहे.
आता या संपूर्ण प्रकरणावर अन्न व औषध प्रशासन खरोखरच जागे होऊन धडक कारवाई करणार, की भेसळमाफियांचे हे साम्राज्य असेच फोफावत राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
