गुन्हेगारी बातमी

महामार्गावर अवैध ट्रक पार्किंगमुळे अपघाताचा धोका वाढला; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

गोंदिया : प्रतिनिधी

गोंदिया–बालाघाट राष्ट्रीय महामार्गावरील नागरा–अंभोरा दरम्यान सध्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे. अशा परिस्थितीत रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात अवैधरित्या ट्रक पार्किंग होत असल्याने वाहतुकीस गंभीर अडथळा निर्माण होत असून अपघाताचा धोका वाढला आहे. या प्रकारामुळे वाहनचालकांसह परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, परिसरातील काही औद्योगिक आस्थापनांकडून मालवाहू ट्रकसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली नाही. परिणामी, अनेक ट्रक थेट राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला उभे केले जातात. रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे आधीच वाहतुकीस अडचणी निर्माण झाल्या असून, त्यात या अवैध पार्किंगमुळे मोठ्या वाहनांना तसेच दुचाकीस्वारांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.

विशेष म्हणजे, या ट्रक पार्किंगमधून संबंधित यंत्रणेला कोणताही महसूल मिळतो का, याबाबतही स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. मात्र, नियमबाह्य पार्किंग सुरू असतानाही संबंधित प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि वाहतूक विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे “नेमके कोणाच्या संरक्षणाखाली हा प्रकार सुरू आहे?” अशी चर्चा परिसरात रंगू लागली आहे.

स्थानिक नागरिकांनी तातडीने महामार्गावरील अवैध ट्रक पार्किंग हटवून संबंधित उद्योगांना स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे. तसेच, भविष्यात या निष्काळजीपणामुळे एखादा गंभीर अपघात होऊन जीवितहानी झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासन स्वीकारणार का, असा संतप्त सवालही नागरिक उपस्थित करत आहेत.

दरम्यान, प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित कारवाई करावी, अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली आहे.