अपघात

बोदलकसा जलाशयात नौकाविहारादरम्यान दोन किशोर बुडाले, शोधकार्य सुरू

गोंदिया, 10: तिरोडा तालुक्यातील बोदलकसा जलाशयात आज एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. बरबसपुरा गावातील नऊ युवकांचा समूह फिरण्यासाठी जलाशय परिसरात गेला होता. यावेळी सर्व युवक मच्छीमारांच्या डोंगीतून नौकाविहार करत असताना अचानक अपघात झाला आणि त्यापैकी दोन युवक पाण्यात बुडाले.

बुडालेल्या युवकांची ओळख मोहित वसंत रहांगडाले व कुणाल शालिकराम भोंडे (दोन्ही रा. बरबसपुरा) अशी झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच तिरोडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयभाऊ रहांगडाले यांनीही घटनास्थळी भेट देऊन बचाव व शोधकार्याची माहिती घेतली तसेच आवश्यक मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.

नौकाविहारासाठी गेलेल्या युवकांमध्ये अक्षय नरेंद्र बिसेन, राकेश राधेश्याम लाडे, निखिल इंदल पटले, लक्की संजय रहांगडाले, प्रलय राधेश्याम पारधी, मनीष रमेश कोकुडे, अविनाश श्रावण टेकाम, मोहित वसंत रहांगडाले आणि कुणाल शालिकराम भोंडे यांचा समावेश होता.