भरधाव रेतीच्या ट्रकची मोटरसायकलला धडक; दोन अल्पवयीन बालकांसह तिघे जखमी, अवैध रेती वाहतुकीविरोधात नागरिकांचा संताप
गोंदिया :- जिल्ह्यातील काटी येथे अवैध रेती वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भरधाव वेगाने धावणाऱ्या रेतीने भरलेल्या ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने दोन अल्पवयीन बालकांसह तिघेजण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी आंदोलन करत प्रशासनाला निवेदन दिले आहे.दिनांक ९ जून रोजी रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास काटी परिसरात ही दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, रेतीने भरलेला एक ट्रक अतिवेगाने जात असताना त्याने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात मोटरसायकल चालकासह दोन अल्पवयीन बालक जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने रेती उत्खनन आणि वाहतुकीवर निर्बंध घातलेले असतानाही अशा प्रकारे रेतीने भरलेले ट्रक रस्त्यावर कसे धावत आहेत, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, संबंधित ट्रक अतिवेगात होता. चालकाच्या बेदरकार वाहनचालकामुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. मात्र उपस्थित ग्रामस्थांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे.
अपघातानंतर संतप्त नागरिकांनी काही काळासाठी धरणे आंदोलन केले. अवैध रेती वाहतुकीवर तात्काळ निर्बंध घालावेत, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि रेती माफियांना मिळणारे संरक्षण थांबवावे, अशी मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली.
यावेळी उपस्थित माजी जिल्हा परिषद सदस्य नरेंद्र तुरकर यांनी पोलीस प्रशासनाला कडक शब्दांत इशारा दिला. यापुढे रेती माफियांची मनमानी खपवून घेतली जाणार नाही. अवैध रेती वाहतुकीस संरक्षण देणाऱ्यांचीही चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
काटी येथील या अपघातामुळे अवैध रेती वाहतूक आणि प्रशासनाच्या कारवाईबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. आता या प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेते आणि दोषींवर काय कारवाई होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
