General

द्वारका नगरातील जलनिस्सारणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

▪️नगर परिषदेकडून वरिष्ठांना दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा रहिवाशांचा आरोप

▪️‘आपले सरकार’ पोर्टलवरील तक्रार निकाली काढली; प्रत्यक्षात नालीच नाही, नागरिकांचा संताप

आमगाव, दि. १२ जून : शहरातील द्वारका नगर, गोंदिया रोड (बनगाव) परिसरातील पावसाळ्यातील जलभरावाच्या गंभीर समस्येवरून स्थानिक नागरिकांनी पुन्हा एकदा नगर परिषद प्रशासनाविरोधात आवाज उठविला आहे. ‘आपले सरकार’ पोर्टलवर दाखल करण्यात आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने नगर परिषदेकडून वरिष्ठ कार्यालयाला वस्तुस्थितीविरोधी माहिती सादर करण्यात आल्याचा गंभीर आरोप रहिवाशांनी केला आहे.

द्वारका नगर परिसरातील नागरिकांनी नगर परिषद आमगावचे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, ‘आपले सरकार’ पोर्टलवरील तक्रार क्रमांक GOVMH/E/2025/0006214 अंतर्गत पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याच्या निचऱ्यासाठी नाली बांधण्याची मागणी करण्यात आली होती. या संदर्भात नगर परिषद प्रशासनाने सह आयुक्त, नगर परिषद प्रशासन नागपूर विभाग यांना पाठविलेल्या पत्रात संबंधित ठिकाणी पाण्याच्या निचऱ्यासाठी तात्पुरती कच्ची नाली तयार करण्यात आल्याचे तसेच भविष्यात पक्क्या नालीचे बांधकाम प्रस्तावित असल्याचे नमूद केले होते.

मात्र, स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार प्रत्यक्ष परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. संबंधित भागात आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कच्ची नाली तयार करण्यात आलेली नाही. तसेच पक्क्या नालीच्या बांधकामाबाबत कोणतीही योजना किंवा प्रस्ताव प्रत्यक्षात दिसून येत नसल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दिशाभूल करणारी माहिती पाठवून तक्रार निकाली काढण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे.

द्वारका नगर परिसरात दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. परिणामी नागरिकांना वाहतूक, आरोग्य, स्वच्छता तसेच दैनंदिन जीवनातील अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती वाढून संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.

यामुळे नगर परिषद प्रशासनाने केवळ कागदोपत्री कार्यवाही न करता प्रत्यक्षात जलनिस्सारणाची प्रभावी व्यवस्था निर्माण करावी, संबंधित ठिकाणी पक्क्या नालीचे बांधकाम तातडीने सुरू करावे आणि परिसरातील नागरिकांना दरवर्षीच्या या समस्येतून कायमस्वरूपी दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या निवेदनाची प्रत सह आयुक्त, नगर परिषद प्रशासन, नागपूर विभाग यांनाही माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी पाठविण्यात आली आहे.

“आश्वासनांची नव्हे तर प्रत्यक्ष कामांची गरज आहे. पावसाळ्यातील जलभरावाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने तातडीने नाली बांधकामाचे काम हाती घ्यावे,” अशी मागणी द्वारका नगरातील नागरिकांनी केली आहे.