स्वास्थ

अधुरे रस्ते, कचऱ्याचे साम्राज्य आणि अतिक्रमणांमुळे अड्याळवासी त्रस्त

त्रस्त अड्याळ ग्रामस्थांची ग्रामविकास मंत्र्यांकडे धाव

ग्रामपंचायत कारभारावर संशयाचे धुके; वरिष्ठ प्रशासन कारवाई करणार का?

अमित रणदिवे/भंडारा: – पवनी तालुक्यातील ऐतिहासिक आणि मोठी बाजारपेठ असलेल्या अड्याळ गावामध्ये सध्या मूलभूत समस्यांचा डोंगर उभा राहिला असून, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. गावातील विदारक परिस्थितीला कंटाळून अखेर त्रस्त अड्याळ येथील अशोक नगर वासियांनी थेट राज्य सरकारचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे धाव घेत या प्रकरणाची सखोल चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

अशोकनगर परिसरात आरोग्याचा गंभीर प्रश्न

अड्याळ येथील अशोकनगर भागातील मुख्य रस्त्याच्या कडेला असलेल्या शेणखताच्या खातकुड्यांमुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. यामुळे स्थानिक नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून, श्वसनाचे आजार बळावण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक ग्रामपंचायतीकडे वारंवार तोंडी व लेखी तक्रारी करूनही कोणतीही कारवाई न झाल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे

अर्धवट कामांमुळे मुख्य रस्ते बनले ‘डेथ ट्रॅप’

गेल्या सात वर्षांपूर्वी राष्ट्रीय ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत नळ पाईपलाईन टाकण्यासाठी लाखो रुपये खर्चून बनवलेले सिमेंट रस्ते फोडण्यात आले होते. मात्र, निधी परत गेल्याचे कारण पुढे करत कंत्राटदाराने काम अर्धवट सोडले. गेल्या पाच वर्षांपासून मुख्य रस्त्यांवरील हे खड्डे अपघातांना कारणीभूत ठरत आहेत. सध्या ‘हर घर नल, हर घर जल’ या दोन कोटी रुपयांच्या योजनेचे काम सुरू असले, तरी जुने खड्डे बुजविण्याचे कोणतेही नियोजन नसल्याने मुख्य रस्ते ‘डेथ ट्रॅप’ बनले आहेत.

अतिक्रमण आणि बेशिस्त पार्किंगचा विळखा

काही राजकीय वरदहस्त असलेल्या पुढाऱ्यांनी आणि नागरिकांनी चक्क मुख्य रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकून रस्ते अडवले आहेत, तर काहींनी मुख्य रस्त्यावरच पक्के घर बांधकाम व दुकाने थाटली आहेत. मुख्य रस्त्यावरील घाणीचे साम्राज्य, बेशिस्त पार्किंग आणि वाढत्या अतिक्रमणामुळे सामान्य नागरिक, महिला व विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे.

ग्रामपंचायत प्रशासन कठोर कारवाई करणार:

या संपूर्ण गंभीर प्रकरणावर ग्रामविकास अधिकारी पौर्णिमा साखरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “सरपंच शिवशंकर मुंगाटे, उपसरपंच शंकर मनापुरे आणि ग्रामपंचायत सदस्यांसोबत गावातील समस्यांचे नियोजन करून या संदर्भात संबंधितांना नोटिसेस बजावण्यात येत आहेत. येत्या आठवड्यात जर खातकुडे व अतिक्रमणे हटविली नाहीत, तर ग्रामपंचायत प्रशासन स्वतः कठोर पावले उचलून खातकुडे हटवेल, परिसर स्वच्छ करेल, रस्त्यांवर घर बांधकामाचे साहित्य ठेवलेले हटवून आणि मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर च्या दुकानदारांनी केलेले अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे करेल.”

प्रशासकीय हेळसांड की ‘अर्थकारण’?

“आता तुकाराम मुंढेंसारखा कडक अधिकारी आणि प्रामाणिक पदाधिकारी मिळाल्यावरच गावात विकासाची गंगा वाहणार का?” असा संतप्त सवाल आता अड्याळची जनता विचारत आहे. केवळ थातूरमातूर डागडुजी करून वरिष्ठ प्रशासन या प्रकरणावर पडदा टाकणार की दोषींवर कडक कायदेशीर कारवाई होणार, याकडे संपूर्ण अड्याळ ग्रामस्थांचे डोळे लागले आहेत.