स्वास्थ

ग्रामीण रुग्णालय सालेकसा येथील आरोग्य सेवांबाबत नागरिकांमध्ये नाराजी; सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा

राजू फुंडे सालेकसा | प्रतिनिधी:- बदलत्या हवामानामुळे परिसरात विविध प्रकारचे व्हायरल इन्फेक्शन, पाण्यामुळे पसरणारे आजार तसेच हंगामी आजारांचे प्रमाण वाढत असून नागरिक मोठ्या संख्येने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय सालेकसा येथे दाखल होत आहेत. मात्र उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना अपेक्षित सुविधा व योग्य वागणूक मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) तसेच अंतररुग्ण विभागात (आयपीडी) रुग्ण आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे. काही नागरिकांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या उर्मट वर्तनामुळे रुग्णांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप केला आहे.

तसेच रुग्णालयात औषधसाठ्याचे योग्य नियोजन नसल्याने काही वेळा आवश्यक औषधे उपलब्ध होत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. याशिवाय रुग्ण व नातेवाईकांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याचीही अपुरी व्यवस्था असल्याचे सांगितले जात आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मूलभूत सुविधांची कमतरता अधिक प्रकर्षाने जाणवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

या सर्व बाबींवर ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने प्रभावी नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याची मागणी होत आहे. विशेषतः रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी रुग्णसेवा, कर्मचाऱ्यांची कार्यपद्धती, औषध उपलब्धता आणि मूलभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करून आवश्यक सुधारणा कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सदर दवाखाना हा नक्षलग्रस्त भागात येत असून आदिवासी बहुल क्षेत्रातील रुग्ण हे तालुक्यातून लांब अंतरावरून येथे उपचारासाठी येतात.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, शासकीय रुग्णालय हे सर्वसामान्यांसाठी आरोग्यसेवेचे महत्त्वाचे केंद्र आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला सन्मानाची वागणूक मिळणे आणि वेळेवर उपचार उपलब्ध होणे आवश्यक आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीमुळे अनेक रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, संबंधित समस्यांवर तातडीने तोडगा काढून रुग्णालयातील सेवा सुधारण्यात याव्यात, अन्यथा परिसरातील नागरिक आंदोलनात्मक भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती पुढे आली आहे. आता याकडे आरोग्य विभाग व संबंधित प्रशासन कितपत गांभीर्याने लक्ष देते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.