सालेकसा बाजार परिसरातील मूलभूत सुविधांचा अभाव; नगर पंचायतीने तातडीने लक्ष देण्याची गरज..!
सालेकसा. राजु फुंडे प्रतिनिधी :- सालेकसा शहरातील साप्ताहिक बाजार अनेक वर्षांपासून भरत असून येथे खरेदी-विक्रीसाठी मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. मात्र बाजार परिसरात आजही अनेक मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने व्यापारी, ग्राहक तसेच भाविकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची खंत व्यक्त करण्यात येत आहे.
बाजारात येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची कोणतीही कायमस्वरूपी व्यवस्था नसल्याने नगर पंचायतीने बाजार परिसरात बोरवेल उभारून शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा सौ. सुनीता थेर यांनी केली आहे.
तसेच वार्ड क्र, 11 बाजार परिसरात नाल्यांची व्यवस्था नसल्यामुळे सांडपाणी रस्त्यावरून वाहत असून परिसरात अस्वच्छता निर्माण होत आहे. याच भागात गायत्री मंदिर व शिव मंदिर असल्याने दररोज तसेच विशेष धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी मोठ्या प्रमाणात भाविकांची वर्दळ असते. मात्र मंदिराकडे जाणारे रस्ते खराब अवस्थेत असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विशेषतः पावसाळ्यात बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात चिखल साचत असल्याने व्यापारी व नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे बाजार परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती, सांडपाणी निचऱ्याची व्यवस्था, नाल्यांचे बांधकाम आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सौ. सुनीता थेर यांनी नगर प्रशासनाकडे केली आहे.
स्थानिक नागरिकांनीही बाजार परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी नगर पंचायतीने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
