गुन्हेगारी बातमी

 माजी सैनिकाच्या अर्जावर कार्यवाहीसाठी लाच मागणारी महसूल सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात

गोंदिया, दि. 18 जून : शासनाकडून माजी सैनिकांना देण्यात येणाऱ्या सिलिंगच्या जमिनीच्या प्रकरणात अर्जावर कार्यवाही करण्याच्या मोबदल्यात 50 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या गोंदिया तहसील कार्यालयातील महिला महसूल सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. आरोपी महिला महसूल सहाय्यक शालू कमलेश कावळे (महसूल सहाय्यक, तहसील कार्यालय गोंदिया) हिला 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे भारतीय नौदलातील माजी सैनिक असून पोलीस विभागातून वरिष्ठ लिपिक पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. माजी सैनिक म्हणून शासनाकडून उपलब्ध होणारी सिलिंगची जमीन (भूमापन क्रमांक 174) त्यांच्या नावावर करण्यासाठी त्यांनी तहसीलदार, गोंदिया यांच्याकडे अर्ज सादर केला होता.

सदर अर्जावर कार्यवाही करून जमीन नावावर करण्यासाठी आरोपी शालू कावळे यांनी तक्रारदाराकडे 50 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. त्यापैकी 10 हजार रुपये आगाऊ देण्याचे आणि उर्वरित रक्कम काम पूर्ण झाल्यानंतर देण्याचे ठरले होते. मात्र तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी 16 जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गोंदिया येथे तक्रार दाखल केली.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. 17 जून रोजी करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान आरोपी शालू कावळे यांनी तक्रारदाराकडून 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले.

कारवाईदरम्यान आरोपीकडून लाचेची 10 हजार रुपयांची रक्कम तसेच एक जुना मोबाईल फोन जप्त करण्यात आला. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक निलेश सुरेश लोधी यांच्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 (सुधारित 2018) च्या कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही सापळा कारवाई पोलीस उपअधीक्षक निलेश लोधी यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली असून शासकीय कामकाजात लाचखोरी करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे.