General

खैरणा परिसरात वनविभागाने मादा बिबटसह तीन बछड्यांना केले जेरबंद

▪️ रोडखालील सिमेंट पाईपमध्ये दिला होता बछड्यांना जन्म; बिबट दिसताच परिसरात उडाली खळबळ

▪️ वनविभागाची तातडीची कारवाई; तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर रेस्क्यू मोहिमेला यश

लाखांदूर तालुका प्रतिनिधी :-

भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील खैरणा परिसरात सोमवारी (दि. ३० जून) दुपारी मादा बिबट व तिचे तीन बछडे आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. दोनाड–खैरणा मुख्य मार्गावरील खैरणा शेतशिवारात मुखरणजी बुरडे यांच्या शेताजवळ रस्त्याखाली टाकण्यात आलेल्या सिमेंट पाईपमध्ये मादा बिबटिणीने तीन बछड्यांना जन्म दिल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर वनविभागाने तातडीने धाव घेत शर्थीच्या प्रयत्नांनंतर मादा बिबटिणीसह तिन्ही बछड्यांना सुरक्षितरीत्या जेरबंद करण्यात यश मिळविले.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे ३ वाजताच्या सुमारास नागरिकांना सिमेंट पाईपजवळ मादा बिबट दिसताच ही बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरली. बिबट पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच लाखांदूर वनविभागाने कोणताही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चुन्ने मार्गदर्शनाखाली वन अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस विभागानेही बंदोबस्तासाठी मदत केली.

वनविभागाने अत्यंत संयमाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने पिंजरा लावून मादा बिबटिणीला सुरक्षितपणे जेरबंद केले. मात्र, बछडे पिंजऱ्यात येत नसल्याने वनकर्मचाऱ्यांनी धाडस दाखवत त्यांना काळजीपूर्वक हाताने पकडून आईसह सुरक्षित ताब्यात घेतले. सायंकाळी सुमारे ६ वाजेपर्यंत ही संपूर्ण बचाव मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

या रेस्क्यूमुळे संभाव्य अनर्थ टळला असून नागरिकांनी वनविभागाच्या तत्परतेचे कौतुक केले आहे. दरम्यान, मादा बिबटिणीसह तीनही बछड्यांना पुढील वैद्यकीय तपासणीनंतर जंगलात सोडण्यात येणार की अन्य सुरक्षित अधिवासात हलविण्यात येणार, याबाबत वृत्त लिहिपर्यंत अधिकृत माहिती उपलब्ध झाली नव्हती.

वनविभागाने नागरिकांना वन्यप्राणी दिसल्यास गर्दी न करता तात्काळ वनविभागाला माहिती देण्याचे आवाहन केले असून, अशा घटनांमध्ये अफवा पसरविणे टाळावे, असेही सांगितले आहे.