गुन्हेगारी बातमी

साखरा (कायनाईट) खाणीतून खनिजासह मुरुमाचाही सर्रास उपसा?

▪️पोकलेन तथा जेसीबीच्या साहाय्याने दिवसाढवळ्या मोठे उत्खनन; महसूल, खनिकर्म आणि प्रदूषण नियंत्रण यंत्रणेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

लाखांदूर तालुका प्रतिनिधी :-

तालुक्यातील साखरा (कायनाईट) खाण परिसरात केवळ कायनाईटच नव्हे, तर मोठ्या प्रमाणात मुरुम व इतर गौण खनिजांचीही सर्रास विक्री होत असल्याची गंभीर चर्चा परिसरात सुरू आहे. प्रचंड क्षमतेच्या पोकलेन तथा जेसीबी मशीनच्या सहाय्याने उत्खनन करून ट्रकच्या ट्रक भरून खनिज बाहेर पाठविले जात असल्याचे चित्र समोर येत आहे. यामुळे शासनाच्या महसुलाला मोठा फटका बसत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, खाण परिसरात मंजुरीच्या अटींचे पालन, रॉयल्टीची वसुली, गौण खनिज वाहतुकीची परवानगी, पर्यावरणीय नियम आणि उत्खननाची मर्यादा यांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे की नाही? याबाबत गंभीर शंका निर्माण झाली आहे. खाणीतून निघणाऱ्या मुरुम व इतर साहित्याची खुलेआम विक्री होत असल्याने संबंधित विभागाच्या देखरेखीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

दररोज धावणाऱ्या जड वाहनांमुळे परिसरातील रस्त्यांची दुरवस्था, धूळप्रदूषण, शेतीचे नुकसान आणि नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. पर्यावरणीय संतुलन धोक्यात येत असताना संबंधित यंत्रणा मात्र मूकदर्शकाची भूमिका घेत असल्याचा आरोपही होत आहे.

ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, खनिकर्म विभाग, महसूल विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने संयुक्त चौकशी करून खाणीतील उत्खनन, मुरुम व इतर गौण खनिजांच्या विक्रीची सखोल तपासणी करावी. नियमबाह्य उत्खनन किंवा विनापरवाना विक्री आढळल्यास संबंधितांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.

▪️प्रत्यक्ष पाहणीतुन उपस्थित झालेले प्रश्न…

समोर आलेल्या छायाचित्रात पोकलेनच्या सहाय्याने ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य भरले जात असल्याचे दिसून येते. त्यामुळे नेमके कोणते खनिज, किती प्रमाणात आणि कोणत्या परवानगीनुसार वाहतूक केली जात आहे, याची चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी जोर धरत आहे.