बिझनेस

गोविंदराव वंजारी फाउंडेशनच्या गोंदिया रोजगार मेळाव्यास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

३,४८८ नोंदणी, १,२७१ युवकांची उपस्थिती, १११ जणांना ऑन-द-स्पॉट ऑफर लेटर

गोंदिया, दि. २५ जुलै: – युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नागपूर पदवीधर मतदारसंघाचे आमदार श्री. अभिजीत वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली गोविंदराव वंजारी फाउंडेशन यांच्या वतीने शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी Lucky Lawns – Emerald, Near Mona Tyres, Gondia येथे भव्य रोजगार मेळाव्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

या रोजगार मेळाव्याला युवक-युवतींचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. मेळाव्यासाठी एकूण ३,४८८ उमेदवारांनी नोंदणी केली असून त्यापैकी ३५७ उमेदवारांनी ऑन-द-स्पॉट नोंदणी केली. मेळाव्याला १,२७१ उमेदवारांनी प्रत्यक्ष उपस्थिती लावली. विविध नामांकित कंपन्यांच्या मुलाखतीनंतर २९१ उमेदवारांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली, तर १११ उमेदवारांना ऑन-द-स्पॉट ऑफर लेटर प्रदान करण्यात आले.

या रोजगार मेळाव्यात ५० हून अधिक नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदवला. Amazon, CEAT, Fiat, Tata Motors, Digital Zoo तसेच IT, Manufacturing, Banking, Finance, Retail आणि Service क्षेत्रातील अनेक आघाडीच्या कंपन्यांनी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. गोंदिया, नागपूर, पुणे, मुंबई आणि इतर शहरांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या.

मेळाव्यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या Pre-Placement Talk ला देखील विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. यामध्ये प्रभावी रेझ्युमे तयार करणे, मुलाखतीतील कौशल्ये विकसित करणे, संवादकौशल्य आणि करिअर मार्गदर्शन याविषयी तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला ,माजी आमदार गोपालदास अग्रवाल, नागपूर पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजीत वंजारी, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अमर वराडे तसेच नगराध्यक्ष सचिन शेंडे जि प सदस्य वंदना काळे, जि प सदस्य छबुताई उके , पप्पू पटले ओमप्रकाश गुप्ता व अनेक मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

चंद्रपूर, भंडारा आणि आता गोंदिया येथील रोजगार मेळाव्यांना मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, गोविंदराव वंजारी फाउंडेशनच्या “३० दिवसांत ६ जिल्ह्यांत ६ रोजगार मेळावे” या उपक्रमाला युवकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून हजारो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा संकल्प अधिक बळकट झाला आहे.

आमदार अभिजीत वंजारी यांनी रोजगार मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी सहभागी कंपन्या, अधिकारी,आणि युवक-युवतींचे आभार मानत आगामी रोजगार मेळाव्यांनाही युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.