गुन्हेगारी बातमी

गोरेगाव तालुक्यातील शेतात विद्युत तारेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू; रानडुकरांपासून पिकांच्या संरक्षणासाठी टाकलेला वीजप्रवाह ठरला जीवघेणा?

गोरेगाव | 29 जुलै

गोरेगाव तालुक्यातील वनपरिक्षेत्रातील नवा टोला–तेढा परिसरात बुधवारी (29 जुलै) सकाळी एक धक्कादायक घटना घडली. शेतात पिकांचे रानडुकरांपासून संरक्षण करण्यासाठी पसरवून ठेवलेल्या विद्युत तारेच्या संपर्कात आल्याने स्थानिक गावातील एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शेतकऱ्याने वन्यप्राण्यांचा शेतात होणारा उपद्रव रोखण्यासाठी शेताभोवती विद्युत तारा पसरवून त्यामध्ये वीजप्रवाह सोडला होता. बुधवारी सकाळच्या सुमारास स्थानिक गावातील युवक त्या तारेच्या संपर्कात आल्याने त्याला जोरदार विद्युत धक्का बसला. या दुर्घटनेत त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, गोरेगाव येथे पाठविण्यात आला आहे.

दरम्यान, मृत युवकाच्या नातेवाईकांनी संबंधितांवर कारवाईची मागणी करत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणात पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी बेकायदेशीरपणे वीजप्रवाह सोडलेल्या तारांचा वापर करणे अत्यंत धोकादायक असून अशा प्रकारच्या घटनांमुळे निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.