क्रिडा

ऑनलाइन पोर्टलच्या विलंबामुळे शालेय क्रीडा स्पर्धांना ब्रेक खेळाडूंच्या मेहनतीवर पाणी फिरण्याची भीती; ऑफलाइन नोंदणीची मागणी

गोंदिया : – शैक्षणिक सत्रात शिक्षणासोबतच क्रीडेलाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. जिल्हा तसेच राज्यातील हजारो विद्यार्थी वर्षभर नियमित सराव करून शालेय क्रीडा स्पर्धांची आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र, यंदा शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजन प्रक्रियेलाच विलंब होत असल्याने खेळाडू, पालक आणि क्रीडा प्रशिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांची नोंदणी, विविध क्रीडा प्रकारांचे वेळापत्रक आणि त्यानंतर जिल्हा, विभागीय, राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचे नियोजन केले जाते. त्यानुसार खेळाडू आणि प्रशिक्षक अनेक महिने आधीपासून सरावाचे नियोजन करतात. मात्र, यंदा शासनाकडून शालेय क्रीडा स्पर्धांची प्रक्रिया ऑनलाइन करण्यासाठी अधिकृत पोर्टल विकसित करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले जात असून, या प्रक्रियेला अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागत असल्याचे चित्र आहे.

– ऑनलाइन प्रक्रियेच्या प्रतीक्षेत हजारो खेळाडू

अद्याप शासकीय क्रीडा पोर्टलची कार्यपद्धती पूर्णपणे सुरळीत सुरू झालेली नसल्यामुळे अनेक खेळाडूंना स्पर्धेसाठी आपली नोंदणी करता आलेली नाही. त्यामुळे वर्षभर मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. नोंदणी प्रक्रिया कधी सुरू होणार, स्पर्धांचे वेळापत्रक कधी जाहीर होणार आणि प्रत्यक्ष स्पर्धा कधी होणार, याबाबत खेळाडू व प्रशिक्षकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

– स्पर्धांचे नियोजन लांबल्याने अडचणी वाढल्या

शालेय क्रीडा स्पर्धांचे जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरीय वेळापत्रक ठरावीक कालावधीत जाहीर होणे अपेक्षित असते. त्यानुसार विद्यार्थ्यांना अभ्यास आणि क्रीडा सरावाचे नियोजन करता येते. मात्र, यंदा प्रक्रियेला झालेल्या विलंबामुळे संपूर्ण क्रीडा वेळापत्रक विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी काही महिन्यांत शालेय परीक्षांचे वेळापत्रकही निश्चित होणार असल्याने क्रीडा स्पर्धांसाठी उपलब्ध असलेला कालावधी आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

– ऑफलाइन नोंदणीला परवानगी का नाही?

ऑनलाइन पोर्टल तयार करण्यास वेळ लागणार असल्याची बाब विभागाला आधीपासूनच लक्षात आली होती, तर पर्यायी व्यवस्था म्हणून तात्पुरती ऑफलाइन नोंदणी सुरू करण्याची परवानगी का देण्यात आली नाही, असा सवाल क्रीडा प्रशिक्षक आणि खेळाडूंकडून उपस्थित केला जात आहे. प्रशासन विविध आपत्कालीन परिस्थितीत पर्यायी यंत्रणा उभी करते. मग विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धांसाठी अशी पर्यायी व्यवस्था का करण्यात आली नाही, असा प्रश्नही पालकांकडून विचारला जात आहे.

– मेहनतीचे काय?

खेळाडू वर्षभर कठोर सराव करून स्पर्धांसाठी तयारी करतात. काही खेळाडूंचे जिल्हा आणि राज्यस्तरीय कामगिरीच्या आधारे पुढील संधींचे नियोजन केले जाते. त्यामुळे स्पर्धांना होणारा विलंब त्यांच्या सरावाच्या नियोजनावर परिणाम करू शकतो. प्रशासनाच्या विलंबाचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या क्रीडा कारकिर्दीवर होऊ नये, अशी अपेक्षा पालक आणि प्रशिक्षक व्यक्त करीत आहेत.

शालेय क्रीडा स्पर्धांच्या ऑनलाइन प्रक्रियेतील अडथळे तातडीने दूर करून नोंदणी सुरू करावी, तसेच पोर्टल पूर्णपणे कार्यान्वित होईपर्यंत आवश्यक असल्यास ऑफलाइन नोंदणीची पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. यंदाच्या स्पर्धांबाबत क्रीडा विभाग नेमकी कोणती भूमिका घेणार, याकडे राज्यभरातील खेळाडू, पालक आणि प्रशिक्षकांचे लक्ष लागले आहे.