General

कटंगीकला येथे मान्सून क्रिकेट टूर्नामेंट उत्साहात संपन्न; शिवशक्ती क्रिकेट क्लब ठरला विजेता

– एकोडी संघ उपविजेता; नगराध्यक्ष सचिन शेंडे व सरपंच मोहिनी वराडे यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव

कटंगीकला/गोंदिया :-  शिवशक्ती क्रिकेट क्लब कटंगीकला यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मान्सून क्रिकेट टूर्नामेंटचा थरारक समारोप उत्साहपूर्ण वातावरणात झाला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा स्पर्धेचे आयोजक जितेश टेमरे यांच्या पुढाकारातून दिनांक २० ते २७ ऑगस्ट या कालावधीत ही क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत विविध संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधून घेतले.

अंतिम सामन्यात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत शिवशक्ती क्रिकेट क्लब कटंगीकला संघाने विजेतेपद पटकावले, तर एकोडी संघाने उपविजेतेपद मिळविले. संपूर्ण स्पर्धेदरम्यान खेळाडूंनी उत्कृष्ट फलंदाजी, गोलंदाजी तसेच सांघिक खेळाचे दर्शन घडविले.

स्पर्धेच्या समारोपप्रसंगी आयोजित पारितोषिक वितरण कार्यक्रमाला गावच्या सरपंच मोहिनी विनाश वराडे तसेच गोंदिया नगराध्यक्ष सचिन गोयंभाऊ शेंडे यांची विशेष उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते विजेता व उपविजेता संघाला ट्रॉफी तसेच रोख व इतर पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही वैयक्तिक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सामनावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज यांसह विविध वैयक्तिक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यामुळे खेळाडूंमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंना शुभेच्छा देत नियमितपणे खेळात सहभाग घेण्याचे आवाहन केले. “शिका, खेळा, जिंका आणि आपल्या गावाचे नाव उज्ज्वल करा,” असा संदेश देत खेळाडूंच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. ग्रामीण भागातील युवकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी अशा क्रीडा स्पर्धांचे आयोजन महत्त्वाचे असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

क्रिकेट स्पर्धेमुळे कटंगीकला परिसरात गेल्या आठवडाभरापासून क्रिकेटचा उत्साह पाहायला मिळत होता. विविध संघांमधील सामने पाहण्यासाठी परिसरातील नागरिक, युवक आणि क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहत होते. अंतिम सामन्यादरम्यानही मैदानावर मोठी गर्दी झाली होती. चौकार-षटकारांसह गोलंदाजांच्या अचूक माऱ्यामुळे सामना रंगतदार झाला.

या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक संघातील बंटी लिलारे, राजेश श्रीभादरे, मनीष मारवाडे, राकेश सव्वालाखे, शैलेश बाचपे, देवेंद्र राणे, ईशू वाघरे , नितीन मडामे, नौशाद मालधारी, संदीप पाटील, राजा मिर्झा, श्रीकांत नातपूरे, शंकर शोनवाने, आशिष मेश्राम यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.