General

गुदमा–प्रतापबाग रेल्वे मार्गासाठी जमीन अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोध; ७ सप्टेंबरला रास्ता रोकोचा इशारा

गोंदिया :-  गुदमा ते प्रतापगड नवीन रेल्वे लाईन उभारण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी व घरांचे अधिग्रहण करण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर गोंदिया तालुक्यातील शेतकऱ्यांची बैठक कटंगी येथील मयूर लॉन येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जमीन अधिग्रहणामुळे प्रभावित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

गुदमा, गोंदिया खुर्द , खमारी, दागोटोला, चुलोद, दत्तोरा, हल्बीटोला, घिवारी, चांदनीटोला, लोधीटोला, कटंगी कला तसेच नागरा परिसरातील ज्या शेतकऱ्यांची शेती अथवा घरे प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी अधिग्रहित होणार आहेत, ते शेतकरी मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित होते.

अपेक्षित मोबदला, कुटुंबातील एकाला नोकरीची मागणी

जमीन अधिग्रहणाच्या बदल्यात शासनाकडून मिळणारा मोबदला हा सध्याच्या परिस्थितीच्या तुलनेत योग्य व अपेक्षित दराने मिळावा, अशी प्रमुख मागणी शेतकऱ्यांनी केली. तसेच जमीन किंवा घर अधिग्रहणामुळे प्रभावित होणाऱ्या प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्यात यावी, अशी मागणीही बैठकीत करण्यात आली.

याशिवाय प्रस्तावित रेल्वे मार्गामुळे गावातील शेतकऱ्यांना शेतात जाण्या-येण्यासाठी अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी रेल्वे लाईनच्या परिसरात आवश्यक ठिकाणी रस्ते उपलब्ध करून देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली. अधिग्रहणाची प्रक्रिया पारदर्शकपणे राबवून शेतकऱ्यांच्या अडचणी व हरकतींचा योग्य विचार करावा, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.

बैठकीत उपस्थित शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी एकजुटीने लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे योग्य भूमिका घेऊन तोडगा काढला नाही, तर आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला.

७ सप्टेंबरला कटंगी नाका येथे रास्ता रोको

प्रशासनाकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्यास सोमवार, ७ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता कटंगी नाका, बालाघाट रोड, गोंदिया येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा आयोजकांनी दिला आहे. त्यामुळे प्रशासन या मागण्यांकडे कोणती भूमिका घेते, याकडे परिसरातील शेतकऱ्यांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.

बैठकीला अखिलेश शेठ, कार्तिक चौहान, सूरज बावनकर, सुप्रित बैंस, राजू चन्नेकर, राजू बीसेन, राधाकृष्ण ठाकूर, चुटे गुरुजी, अयूब शेख, जितेंद्र लिल्लारे, गजेंद्र कवास यांच्यासह परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.