संयुक्त राष्ट्रांकडून बालविवाहाविरुद्धच्या ‘जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रन’ संचालित मोहिमेची दखल; ऐतिहासिक ‘जागतिक दिन’ केला जाहीर
गोंदिया :- जिल्ह्य बालविवाहाविरुद्ध जमीनी पातळीवर अभियान राबविणाऱ्या इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी, गोंदिया यांनी संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत केले आहे. संयुक्त राष्ट्रांनी २७ नोव्हेंबर हा दिवस ‘बालविवाह, अल्पवयीन विवाह आणि सक्तीच्या विवाहांच्या निर्मूलनाचा आंतरराष्ट्रीय दिन’ म्हणून घोषित केला आहे.
संयुक्त राष्ट्रांची ही घोषणा म्हणजे ‘जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रन’ (जेआरसी) च्या अभूतपूर्व प्रयत्नांना मिळालेली जागतिक मान्यता असल्याचे संस्थेने म्हटले आहे. ‘जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रन’ हे बालविवाहाविरोधात देशभरात शासन आणि प्रशासनासोबत काम करणारे भारतातील सर्वात मोठे स्वयंसेवी संस्थांचे नेटवर्क आहे. इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी, ही संस्था जेआरसीची भागीदार असून, बालविवाहाविरोधात एक विशेष आंतरराष्ट्रीय दिन घोषित केला जावा यासाठी जेआरसी अनेक वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करत होती.
शिक्षक दिनानिमित्त संस्कार हायस्कूल गोंदिया येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना, इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी चे संचालक अमित बेलेकर म्हणाले की, भारतामधून उठवलेला आवाज आज एक जागतिक संकल्प बनला आहे. “आपल्या प्रयत्नांना जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे, हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. संयुक्त राष्ट्रांनी बालविवाह रोखण्यासाठी समर्पित जागतिक दिनासाठी २७ नोव्हेंबर या तारखेची निवड करणे ही देखील भारतासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. २०२४ मध्ये याच दिवशी भारत सरकारने जेआरसी च्या भागीदारांसोबत मिळून ‘बालविवाह मुक्त भारत’ मोहिमेची सुरुवात केली होती.
ज्ञानेश्वर पटले जिल्हा समन्वयक (बाल विवाह मुक्त भारत अभियान) आय एस डब्लु एस हे मनाले कि आता प्रत्येक मुलाला बालविवाहमुक्त बालपण मिळावे, हे सुनिश्चित करणे आपली जबाबदारी आहे. यांनी बालविवाहमुक्त भारतासाठी सरकार, प्रशासन, शिक्षक, धर्मगुरू आणि नागरिकांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले .
‘जस्ट राइट्स फॉर चिल्ड्रन’ (JRC) चे संस्थापक भुवन रिभू यांनी बालविवाह रोखण्यासाठी एका विशेष दिवसाची घोषणा करण्याबाबत जागतिक स्तरावर आवाहन केले होते. मार्च २०२६ मध्ये संयुक्त राष्ट्रांमध्ये (UN) भाषण करताना, रिभू यांनी या प्रस्तावाचा पुनरुच्चार केला. भारतासह ६७ देशांच्या पाठिंब्याने संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत (UNGA) एक ठराव मांडला; या ठरावाद्वारे २७ नोव्हेंबर हा दिवस बालविवाह निर्मूलनासाठी समर्पित जागतिक दिवस म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव होता. अखेरीस, ४ सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्रांनी हा ठराव मंजूर केला.
याप्रसंगी उपस्थित ४० शिक्षकांचे भेटवस्तू व सम्मानपत्र देऊन गौरव करण्यात आले.
यावेळी संस्कार हायस्कूल चे सचिव मधु बन्सोड, जयश्री फुले प्राचार्य व शाळेतील शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुर्णप्रकाश कुथेकर, दीपमाला भालेराव, भाग्यश्री ठाकरे, अमोल पानतावणे, पूजा अनकर, आचल फुलेकर, शीतल राऊत, अपूर्व फुले, राजकुमार वैद्य, यांनी अथक परिश्रम घेतले.
