सामाजिक

तिरोडा रेल्वे फाटकावर प्रवाशांची गैरसोय; उड्डाण पुलाचे काम रखडल्याने नागरिक संतप्त

 

तिरोडा :- शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या रेल्वे फाटकामुळे प्रवाशांना दररोज मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आधीच रस्त्यांवरील अडथळ्यांचा सामना करावा लागत असताना, त्यात रेल्वे फाटकाचा अतिरिक्त अडथळा नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. विशेष म्हणजे एकाच वेळी दोन ते तीन रेल्वे गाड्या क्रॉस होत असल्याने फाटक बराच वेळ बंद राहते आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबलचक रांगा लागतात.

सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढलेली असून कडक उन्हामध्ये प्रवाशांना तासन्तास फाटक उघडण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. तिरोडा येथील तहसील कार्यालय, पंचायत समिती तसेच कौलेवाडा आणि इतर भागांकडे जाणाऱ्या मार्गावर हे रेल्वे फाटक असल्याने या मार्गावरील वाहतूक सतत प्रभावित होत आहे. नागरिकांना अत्यावश्यक कामांसाठी बाहेर पडावे लागते, मात्र फाटक बंद असल्यामुळे त्यांचा वेळ वाया जात असून मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे.

सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकजण प्रवास करत आहेत. मात्र रेल्वे फाटकाजवळ कोणतीही तात्पुरती सुविधा नसल्याने नागरिकांना उभ्याउभ्याच उन्हाचा सामना करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्याची, सावलीची किंवा बसण्याची कोणतीही व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आलेली नसल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

विशेष म्हणजे मागील दोन वर्षांहून अधिक काळापासून या ठिकाणी उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र आजपर्यंत पुलाचे काम पूर्णत्वास गेलेले नाही. त्यामुळे शासन आणि लोकप्रतिनिधींनी प्रवाशांच्या सोयीसुविधांकडे दुर्लक्ष केल्याच्या चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागल्या आहेत.

दरम्यान, रेल्वे फाटकावरील वाहतूक कोंडी आणि नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात तसेच रखडलेले उड्डाण पुलाचे काम वेगाने पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.