भ्रष्टाचाराच्या विरोधात ग्रामपंचायतीच्या कपाटाला सील; शासकीय कामात अडथळ्याचा आरोप
कल्पात्री ग्रामपंचायतीतील प्रकार; बीडीओंचे गोरेगाव पोलिसांना एफआयआरसाठी पत्र
गोरेगाव प्रतिनिधी :- कायद्यानुसार १५ ऑगस्टच्या कालावधीत ग्रामसभा घेण्याची प्रक्रिया असताना कल्पात्री ग्रामपंचायतीत ग्रामसभेच्या आयोजनावरून वाद निर्माण झाला आहे. दिनांक २१ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कल्पात्री येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, ग्रामसेवक उपस्थित नसल्याने ग्रामस्थांनी ग्रामसभा स्थगित करण्याची मागणी केली. त्यानंतर स्थगित झालेली ग्रामसभा ३१ ऑगस्ट रोजी सरपंच शेषकुमार रहांगडाले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
या ग्रामसभेदरम्यान मागील पाच वर्षांचा जमा-खर्चाचा दस्तऐवज सादर करण्यात आला नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. यावरून अभिजीत पुरुषोत्तम मेंढे, सुजीत खरोले व इतर ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या कपाटाला सील लावल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या सील लावण्याच्या कारवाईवर सरपंच शेषकुमार रहांगडाले यांनीही स्वाक्षरी केल्याची माहिती समोर आली आहे.
ग्रामपंचायतीच्या कार्यालयातील कपाटाला अशाप्रकारे सील लावणे ही गंभीर बाब असून, त्यामुळे ग्रामपंचायतीचे प्रशासकीय कामकाज प्रभावित झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर खंडविकास अधिकारी, पंचायत समिती गोरेगाव यांनी विस्ताराधिकारी पंचायत टी. डी. बिसेन, ए. ए. सेवेकर आणि के. पी. कोरे, समूह समन्वयक, स्वच्छ भारत मिशन यांना चौकशीसाठी कल्पात्री येथे पाठविले.
मात्र, चौकशीसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी चौकशी करू दिली नसल्याचा प्रशासनाचा आरोप आहे. जोपर्यंत ग्रामपंचायतीकडून लेखी हमी दिली जात नाही, तोपर्यंत चौकशी करू देणार नाही तसेच लावलेले सील काढू देणार नाही, अशी भूमिका काही ग्रामस्थांनी घेतल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे गावातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
ग्रामपंचायतीच्या कपाटात ब्लीचिंग पावडरचा वापर, प्रशासकीय कामकाज तसेच इतर आवश्यक कागदपत्रे असल्याने संबंधित माहिती वरिष्ठ कार्यालयाला सादर करण्यात अडथळा निर्माण होत असल्याचे प्रशासनाकडून नमूद करण्यात आले आहे. तसेच पावसाळ्यातील आवश्यक कामे व आपत्कालीन उपाययोजनांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
शासकीय कामात अडथळा आणणे तसेच ग्रामपंचायतीच्या कपाटाला कथितरीत्या बेकायदेशीर सील लावल्याप्रकरणी संबंधितांविरुद्ध एफआयआर नोंदविण्याची मागणी करणारे पत्र खंडविकास अधिकारी, पंचायत समिती गोरेगाव यांनी गोरेगाव पोलिस ठाण्याला दिल्याची माहिती आहे. या प्रकरणी ग्रामसेवक समितीच्या सदस्यांनी एकजूट होत पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केल्याचेही सांगण्यात आले. या विषयी पोलीस प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
