भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यांचाही दुष्काळग्रस्तांच्या यादीत समावेश करा
माजी खा. सुनील मेंढे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
गोंदिया :- भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील भंडारा, पवनी, लाखांदूर व तिरोडा या तालुक्यांचा ‘ट्रिगर १’ मध्ये समावेश करण्यात आला असल्याने ते तालुके दुष्काळग्रस्त घोषित झाले आहेत. परिणामी त्यांना विविध सवलती आणि उपाययोजनाचा लाभ मिळणार आहे. करीता माजी खासदार सुनिल मेंढे यांनी मा. मुख्यमंत्री यांचे आभार व्यक्त केले आहे.
मात्र, भौगोलिक परिस्थिती आणि हवामान सारखेच असूनही उर्वरित तालुके यातून वगळण्यात आल्याने इतर तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून उर्वरित तालुक्यांचाही दुष्काळग्रस्त श्रेणीत समावेश करण्याची मागणी केली आहे.
सुनील मेंढे यांनी आपल्या पत्रात दोन्ही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीवर प्रकाश टाकला आहे. चालू खरीप हंगामात अल निनोच्या प्रभावामुळे पावसात मोठी अनियमितता आणि खंड निर्माण झाला आहे. प्रतिकूल हवामानामुळे पिकांवर अडीचा प्रादुर्भाव, खोडकिडा, करपा, गादमाशी आणि तुडतूडा सारख्या रोगांचा प्रादुर्भाव होऊन धान पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र दुष्काळ घोषित करताना जून ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्याच्या निकषावर काही तालुक्यांचा ‘ट्रिगर १’ मध्ये समावेश करण्यात आला. परंतु, केवळ या निकषाच्या आधारे संपूर्ण परिस्थितीचे योग्य मूल्यमापन होऊ शकत नाही, असे मेंढे यांनी म्हटले आहे. भौगोलिक परिस्थिती, हवामान आणि कृषी रचना सारखीच असतानाही तुमसर, मोहाडी, साकोली, लाखनी, गोंदिया, गोरेगाव, सडक-अर्जुनी, अर्जुनी-मोरगाव, सालेकसा व देवरी अशा भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील तालुक्यांना यादीतून वगळण्यात आले आहे. सदर तालुके प्रामुख्याने धान उत्पादक असून राज्याच्या अन्नधान्य उत्पादनात येथील शेतकऱ्यांचे मोठे योगदान आहे.
सध्या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी पूर्णपणे खचला आहे. त्यामुळे या सर्व तालुक्यांचा दुष्काळग्रस्त म्हणून ट्रिगर १ यादीत समावेश व्हावा आणि शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत आणि सवलती उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी माजी खासदार सुनील मेंढे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
