भुसावळ येथे आरोग्य सेवकांचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा
आरोग्य सेवकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार – सौ. रजनी सावकारे यांचे आश्वासन
भुसावळ :- आरोग्य सेवकांच्या विविध प्रलंबित मागण्यांना वाचा फोडण्यासाठी आरोग्य समन्वय समितीच्या वतीने भुसावळ नगरीत आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात आरोग्य सेवकांचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी विविध भागांतून मोठ्या संख्येने आरोग्य सेवक उपस्थित होते.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मा. सौ. रजनी सावकारे, महिला व बालकल्याण सभापती श्रीमती शोभा बच्छाव, चक्रधर नगरीचे माजी नगरसेवक श्री. बोधराज चौधरी तसेच तत्कालीन नगरसेविका श्रीमती प्रिया चौधरी यांची उपस्थिती होती.
या आरोग्य मेळाव्याच्या माध्यमातून आरोग्य सेवकांच्या विविध महत्त्वपूर्ण मागण्या मांडण्यात आल्या. त्यामध्ये प्रामुख्याने पुढील मागण्यांचा समावेश होता.
1. आरोग्य सेवक या पदनामात बदल करून त्याऐवजी ग्राम आरोग्य अधिकारी असे नामकरण करण्यात यावे.
2. आरोग्य सेवकांच्या कर्तव्य व जबाबदाऱ्यांमध्ये सध्याच्या बदलत्या परिस्थितीनुसार सुधारणा करण्यात यावी.
3. आरोग्य सेवकांच्या प्रवास भत्त्यात वाढ करून सुधारित दरानुसार नवीन प्रवास भत्ता लागू करण्यात यावा.
4. आरोग्य सेवक कर्मचाऱ्यांना विभागीय परीक्षा लागू करण्याबाबत योग्य निर्णय घेण्यात यावा.
यावेळी प्रमुख अतिथी सौ. रजनी सावकारे यांनी आरोग्य सेवकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली. तसेच माननीय श्री. संजयजी सावकारे साहेब, वस्त्रोद्योग मंत्री यांच्या माध्यमातून आरोग्य सेवकांचे प्रलंबित प्रश्न शासन दरबारी मांडून ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील आणि आरोग्य सेवक कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
या मेळाव्यामुळे आरोग्य सेवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आपल्या न्याय्य मागण्यांसाठी संघटितपणे प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
