राजकीय

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यात १५ हजार दिवाळी शिधा बॅगचे वितरण

– शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून उपक्रम

– आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते वाटप आज

भंडारा :-  यंदा अत्यल्प पावसामुळे राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. अशा कठीण परिस्थितीत शेतकरी, गरीब आणि गरजू कुटुंबांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, या उदात्त हेतूने शिवसेनेचे प्रमुख नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभर दिवाळी शिधा वितरणाचा संकल्प केला आहे. या उपक्रमांतर्गत भंडारा जिल्ह्यासाठी एकूण १५ हजार शिधा बॅग पाठविण्यात आल्या असून, त्यांचे वितरण शुक्रवार, ६ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे.

भंडारा जिल्ह्यातील गरजू लाभार्थ्यांना या शिधा बॅगचे वितरण आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यासाठी भंडारा शहरात ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता, तर पवनी शहरात दुपारी ३ वाजता वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील हजारो गरजू कुटुंबांपर्यंत दिवाळीचा आनंद पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच हे वितरण तीन दिवस चालणार असून ७ ब 8 नोव्हेंबर रोजी ग्रामीण क्षेत्रात हा सीधा पोहचता करण्यात येणार आहे. या शिधा प्राप्ती करिता नेमण्यात आलेलेया लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड व त्याची एक झेरोक्स सोबत आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील तीन विधानसभा क्षेत्रांसाठी शिधा बॅगचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार साकोली विधानसभा क्षेत्रासाठी ३ हजार, तुमसर विधानसभा क्षेत्रासाठी ३ हजार, तर भंडारा विधानसभा क्षेत्रासाठी सर्वाधिक ९ हजार शिधा बॅग उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अशा प्रकारे संपूर्ण जिल्ह्यात १५ हजार कुटुंबांना या उपक्रमाचा लाभ मिळणार आहे.

शिधा वितरणासाठी पात्र लाभार्थ्यांची यादी मुख्यालयातून पाठविण्यात आली असून, त्यानुसार वितरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. नैसर्गिक संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकरी आणि गरजू कुटुंबांना सणासुदीच्या काळात आधार मिळावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. शिवसेनेच्या या उपक्रमामुळे दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या अनेक कुटुंबांची दिवाळी गोड होण्यास मदत होणार आहे.

– सायकील आणि शिलाई मशीनही देणार

या दुष्काळी परिस्थितीत निराधार, आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंब तसेच शेतमजुरांना रोजगारात सहकार्य व्हावे या उद्देशाने शुव्सेना प्रमुख एकनाथ शिंदे साहेब यांनी सायकील आणि शिलाई मशीनचे वाटप करण्याचे सुद्धा ठरविले आहे. यात भंडारा विधान सभा करिता 500 सायकील आणि 500 शिलाई मशीन पाठविण्यात येणार असून त्याचे वाटप दिवाळी नंतर करण्यात येणार असल्याचे पत्रका द्वारे भंडारा जिल्हा शिवसेना तर्फे कळविण्यात आले आहे.