राष्ट्रीय महामार्ग वरील पाणी खाजगी शेतात..! शेतकरी होणार हवालदिल?
– पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी खाजगी शेती का निवडली?
– न्याय मागणीसाठी शेतकर्याची मुख्य अभियंत्यांकडे तक्रार
रावणवाडी /गोंदिया :- गोंदिया बालाघाट मार्गावरून राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती होत असताना परिसरातील पावसाळ्याचे पाण्याची निचरा होण्यासाठी रस्त्याच्या कडेला लागून असलेल्या नालीची व्यवस्था करण्यात आली आहे त्याद्वारे गावातील पाणी हा गावाबाहेर सोडल्या जाण्याची उपाययोजना करण्यात येते. मात्र सदर पावसाचे पाणी जाण्यासाठी निचरा करण्यासाठी थेट खाजगी व्यक्तीच्या शेतात सोडले जात असल्याने पीडित शेतकऱ्याने त्याच्या सुपीक जमिनीवर होत असलेल्या अन्याय विरोधात यलगार पुकारला आहे.
त्याचे झाले असे की राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 543 गोंदिया जबलपूर हायवे हे रावणवाडी येथून जात असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूस पावसाळ्याचे पाणी निचरा करण्यासाठी नालीचे बांधकाम करण्यात आले आहे. या योजनेमुळे गावातील पाणी हे गावाबाहेर पडेल व गावात स्वच्छतेचा वातावरण निर्माण होईल या उद्देशाला हरताळ फासल्याची घटना पुढे येत आहे सदर पावसाळ्याचे पाणी निचरा करण्यासाठी एखाद्या शासकीय जमिनीतून नाही तर थेट गावातील शेतकरी टेकचंद येवले यांच्या शेतातून जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे एका वेळी संपूर्ण गावातील पाण्याचा लोंढा हा येवले यांच्या शेतातून जात असल्याने त्यांची सुपीक जमीन ही कायमची कमकुवत होण्याची शक्यता आहे. या नालीचे बांधकाम होत असताना पीडित शेतकऱ्यांनी आवाज उठवून न्याय हक्कासाठी कंत्राटदारांना बोलले असता याविषयी आपण काही करू शकत नसल्याचे कंत्राटदार म्हणाले. तेव्हा सदर प्रकरणाची तक्रार पीडित शेतकऱ्याने मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे केली असून सदर विषयावर तातडीने लक्ष घालून समस्येच्या निपटारा करण्यात यावा याविषयीची अपील केली आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी या समस्येच्या निराकरण करण्यात यावा व न्याय देण्यात यावा अशी मागणी केली आहे.
