ओबीसी जनगणना बहिष्कार आंदोलनाला गोंदिया जिल्हा सरपंच संघटनेचा जाहीर पाठिंबा
राष्ट्रपती, केंद्रीय गृहमंत्री यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर
गोंदिया, दि. २२ मे : राष्ट्रीय जनगणनेमध्ये इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) करिता स्वतंत्र रकाना समाविष्ट करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी सुरू असलेल्या ओबीसी समाजाच्या बहिष्कार आंदोलनाला गोंदिया जिल्हा सरपंच संघटनेने जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. यासंदर्भातील निवेदन राष्ट्रपती, केंद्रीय गृहमंत्री तसेच जिल्हाधिकारी गोंदिया यांना सादर करण्यात आले.
गोंदिया जिल्हा सरपंच संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, राष्ट्रीय जनगणनेत ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकाना नसल्यामुळे समाजामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. ओबीसी समाज हा देशातील शेतकरी, कष्टकरी, श्रमिक, कारागीर व पारंपरिक व्यवसाय करणारा समाज असून देशाच्या आर्थिक व सामाजिक व्यवस्थेचा महत्त्वाचा घटक आहे. अशा समाजाची स्वतंत्र व अचूक जनगणना न होणे ही गंभीर बाब असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
केंद्र सरकारकडून वेळोवेळी ओबीसी जनगणनेबाबत आश्वासने देण्यात आली असली तरी प्रत्यक्ष जनगणना प्रक्रियेमध्ये स्वतंत्र रकान्याचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे ओबीसी समाजामध्ये असंतोष वाढत असून समाजाने पुकारलेल्या बहिष्कार आंदोलनाला गोंदिया जिल्हा सरपंच संघटनेने पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे.
तसेच, केंद्र शासनाने तात्काळ राष्ट्रीय जनगणनेमध्ये ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना समाविष्ट करून स्वतंत्र ओबीसी जनगणना करण्याचा निर्णय घ्यावा, अशी ठाम मागणीही संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा देशभरातील ओबीसी समाजाचा असंतोष अधिक तीव्र होण्याची शक्यता असल्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देताना गोंदिया जिल्हा सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा भजेपारचे सरपंच चंद्रकुमार बहेकार, संघटनेचे मार्गदर्शक तथा खोडशिवणीचे सरपंच गंगाधर परशुरामकर, गोरेगाव तालुकाध्यक्ष तथा मोहाडीचे सरपंच नरेंद्रकुमार चौरागडे, सालेकसा
तालुकाध्यक्ष तथा गोरेचे सरपंच रामेश्वर कटरे, सालेकसा महिला तालुकाध्यक्ष तथा तिरखेडी सरपंच प्रिया शरणागत, गिरोला सरपंच रविता मेंढे, गांधीटोला सरपंच दीपिका मेंढे, बाम्हणीचे सरपंच तथा सडक अर्जुनी सरपंच संघटनेचे पदाधिकारी माधोराव तरोने यांच्यासह जिल्ह्यातील इतर सरपंच उपस्थित होते.
