साई कॉलोनी परिसरातील दुर्गंधीयुक्त पाणीसाठ्यामुळे नागरिक त्रस्त..!
रोगराई पसरण्याची भीती; प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
तिरोडा :- शहरातील साईनगर परिसरात एका खाजगी प्लॉटवर मोठ्या प्रमाणात साचलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या पाणीसाठ्यातून तीव्र दुर्गंधी पसरत असून त्यामध्ये विविध प्रकारचे जिवाणू, कीटक व डासांची उत्पत्ती होत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर पाणीसाठ्याच्या लगतच लोकवस्ती असल्यामुळे येथील रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः सायंकाळच्या वेळी डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून लहान मुले, वृद्ध नागरिक आणि महिलांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. परिसरात अस्वच्छता वाढल्याने आगामी काळात डेंग्यू, मलेरिया, फायलेरिया यांसारख्या गंभीर आजारांचा फैलाव होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. पाण्याचा निचरा करण्यासाठी तसेच परिसरात औषध फवारणी व स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
आरोग्याच्या दृष्टीने ही गंभीर बाब असून नगर परिषद प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन संबंधित खाजगी प्लॉट मालकावर कारवाई करावी तसेच साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावून परिसर स्वच्छ करावा, अशी मागणी साईनगर परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
