General

अतिक्रमणाच्या मुद्द्यावर अड्याळची ग्रामसभा गाजली ! आता गावातील अतिक्रमण हटणार ?

– अन्यथा मुजोर अतिक्रमणधारकांवर पोलीस पाहाऱ्यात होणार कारवाई; ग्रामपंचायत प्रशासनाने कसली कंबर

 

अमित रणदिवे /भंडारा:-  “आम्ही नियमित कर भरूनही आमच्या नशिबी नरकयातना का?” असा संतप्त सवाल करत पवनी तालुक्यातील हनुमंतरायाचे तीर्थक्षेत्र असलेल्या अड्याळ येथील त्रस्त नागरिकांनी थेट राज्याच्या ग्रामविकास मंत्र्यांकडे लेखी तक्रार नोंदवली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत गुरुवारी २५ जुन ला आयोजित करण्यात आलेली अड्याळची ग्रामसभा अतिक्रमणाच्या आणि गावातील प्रलंबित समस्यांच्या मुद्द्यावरून चांगलीच वादळी ठरली. शासकीय जमिनी लाटणाऱ्या , नालीवर पक्के घर बांधकाम केल्याचा तसेच भर रस्त्यावर दुकानदारी थाटून अतिक्रमण केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. स्थानीक ग्राम पंचायत प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर संतप्त ग्रामस्थांनी प्रश्नांची सरबत्ती केल्याने सभेत प्रचंड गोंधळ होता दिसताच ग्रामपंचायत प्रशासनाने आक्रमक पाऊल उचलत रुग्णवाहिका जाण्यासाठी सुद्धा अडचण निर्माण करणारे वर्दळीचे रस्ते मोकळे करण्यासाठी, विद्यार्थी, वृद्ध तसेच अपंग व्यक्तींच्या आवागमनासाठी आता थेट पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

पुन्हा कुणी चिमुकल्याचा जीव जाऊ नये यासाठी आता मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर दुकानदारी थाटलेल्या व्यावसायिकावर आणि नालीवर पक्के बांधकाम केलेल्या अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावून व दवंडी देऊन पोलीस पाहाऱ्यात रस्ते मोकळे केले जातील.

तसेच रस्त्यावरील अडथळा ठरणारे विद्युत व टेलिफोन खांब हटवले जातील.नवीन नळ योजनेसाठी खोदलेले रस्ते सिमेंटने तातडीने बुजवणे आणि नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे, गुजरी चौक, बसस्थानक आणि महामार्गावरील बेशिस्त पार्किंग व रस्त्यावरील दुकाने हटवून वाहतूक सुरळीत करणे.

गावातील नाल्यांची सफाई करणे, अशोक नगर येथील खातकुळे उचलून,जीर्ण स्वच्छतागृहे पाडणे, बाजार तलावातील कचऱ्याची विल्हेवाट लावणे आणि कचरा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे फलक लावणे. तसेच किटाळी टी-पॉइंटवरील पावसाच्या पाण्याचे नियोजन करणे. इत्यादी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

मात्र समाजकारणाच्या आड पदग्रहण करून स्वार्थकारण करणारे ,आणि मुजोर अतिक्रमधारक ग्रामसभेत फिरकलेच नसल्याची चर्चा ग्रामस्थांकरवी दबक्या आवाजात सुरू होती.

यावेळी सरपंच शिवशंकर मुंगाटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत उपसरपंच शंकर मानापुरे, ग्रामविकास अधिकारी पौर्णिमा साखरे, सर्व सदस्य, महिला बचत गट व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेत ‘आमचा गाव आमचा विकास’ अंतर्गत विकासकामांचे नियोजनही करण्यात आले. प्रशासनाच्या या धडक ‘अ‍ॅक्शन मोड’मुळे बड्या अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले असून, आता संपूर्ण भंडारा जिल्ह्याचे लक्ष या कारवाईकडे लागले आहे.