अड्याळ परिसरातील अवैध धंदे रोखण्याचे नव्या ठाणेदारांसमोर तगडे आव्हान!
अमित रणदिवे/भंडारा :- जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील एकेकाळी शांत, सुसंस्कृत आणि विदर्भातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अड्याळ आणि परिसरातील गावांमध्ये सध्या अवैध धंद्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. अशातच आता अड्याळ पोलीस ठाण्यात नवे ठाणेदार रुजू झाले असून, त्यांच्यासमोर या भागात पाय पसरलेल्या गुन्हेगारीचे आणि अवैध धंद्यांचे साम्राज्य उद्ध्वस्त करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
“स्वागत आणि ‘पुष्पगुच्छा’च्या बुरख्याआड काळे धंदे नवे ठाणेदार रुजू होताच परिसरात एक वेगळाच ‘परंपरागत खेळ’ सुरू झाल्याची जोरदार चर्चा आहे. नवे साहेब आले की, पोलीस ठाण्यात जाऊन त्यांचे स्वागत करायचे, पुष्पगुच्छ द्यायचे आणि ‘आपले ठाणेदारांशी जवळीक हितसंबंध आहेत’ असे दर्शवून ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करायचे; या बुरख्याखाली आपले अवैध धंदे खुलेआम चालवायचे, अशी ठराविक युक्ती काही संधीसाधूंनी शोधून काढली आहे. समाजसेवेचा आव आणणाऱ्या आणि राजकीय वरदहस्त लाभलेल्या अशा घटकांपासून नव्या ठाणेदारांनी सावध राहण्याची अत्यंत गरज असल्याचा सूर सुज्ञ नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
७७ गावांच्या परिसरात दारूचा महापूर अड्याळ येथील इंग्रजकालीन पोलीस स्टेशन अंतर्गत जवळपास ७७ गावांचा मोठा परिसर येतो. यात अड्याळ, कोंढा, कोसरा, चिचाळ, गोसे, भावड, पहेला, तिर्री आणि लगतच्या जंगल शिवारात पहाटे ४ वाजेपासूनच राजरोसपणे मोहफुलाची दारू गाळली आणि विकली जात आहे. विशेष संतापजनक बाब म्हणजे, ज्या गावांनी शासकीय नियमांनुसार अधिकृतपणे ‘दारूमुक्तीचा ठराव’ केला आहे, त्या गावांच्या वेशीवर आणि झुडपी शिवारातही दारूचे गुन्हे जोरात सुरू आहेत. या गावठी दारूमुळे अनेक कष्टकरी कुटुंबांतील करते पुरुष आणि अल्पवयीन शाळकरी मुले व्यसनाच्या आहारी गेली असून, घरगुती हिंसाचार आणि आर्थिक गरिबीने सीमा ओलांडली आहे.
सट्टापट्टी आणि गांजाची ‘चिलम’ खुलेआम दिवसाढवळ्या मुख्य चौकांतील पानठेल्यांवर सट्टापट्टी चालवली जाते. धक्कादायक बाब म्हणजे, काही पानठेल्यांवर गांजा ओढण्यासाठी लागणारी ‘मातीची चिलम’ देखील खुलेआम विकली जात आहे. अड्याळ परिसरातील शेतशिवारात आणि कालव्यांवर (कॅनाल) सकाळी व सायंकाळी अनेक अल्पवयीन, विद्यार्थी आणि तरुण चिलम ओढताना सर्रास दिसतात. कॅरम खेळण्याच्या बहाण्याने आणि गावातील पानटपरी, आणि चौकांमध्ये रात्रंदिवस तरुण टवाळखोरांचा आणि मद्यप्यांचा सुळसुळाट वाढला असून, मोठ्या आवाजात होणाऱ्या शिवीगाळीमुळे महिला व नागरिकांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
आचारसंहितेतही कायदे धाब्यावर; रेती व मुरुमाची रात्रभर तस्करीव सध्या विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता सुरू असतानाही कायद्याची कडक अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. रात्री उशिरापर्यंत काही पानटपऱ्या, आईस्क्रीम विक्रेते, हॉटेल्स आणि बार सुरू असतात. पोलिसांनी रात्रीची चोख पेट्रोलिंग करून यावर अंकुश लावावा, अशी मागणी पालकांकडून होत आहे. तसेच नदीपात्रातून रात्रीच्या अंधारात विना नंबर प्लेटच्या ट्रॅक्टर व ट्रॉलीद्वारे रेती आणि मुरुमाची मोठ्या प्रमाणावर तस्करी सुरू आहे. ‘प्रशासन सुस्त आणि रेती चोर गब्बर’ अशी थेट टीका जनता करत आहे. पोलिसांची रात्रीची गस्त नक्की गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी आहे की तस्करांना वाट मोकळी करून देण्यासाठी? असा तिखट सवाल उपस्थित केला जात आहे. किटाडी टी-पॉइंट वरील महसूल विभागाची तपासणी चौकी रात्रीच्या वेळी बंद असते, ज्याचा पूर्ण फायदा तस्कर घेत आहेत.
व्यसनाचा विळखा: घरे, शेती गहाण या सर्व अवैध धंद्यांमागे काही तथाकथित प्रतिष्ठित, पांढरपेशा व्यक्ती आणि राजकीय बुरखा पांघरलेल्या लोकांचा वरदहस्त असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. व्यसनाचा खर्च भागवण्यासाठी गरिबांनी आपली घरे गहाण ठेवली, तर काहींनी शेती विकली. यामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत.
तंटामुक्ती समिती आणि पोलीस पाटलांचे अवैध धंद्यांना अभय एकीकडे गावात शांतता आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तंटामुक्ती समिती अध्यक्ष आणि पोलीस पाटलांवर असताना, दुसरीकडे मात्र त्यांच्याच कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या अवैध धंद्यांना त्यांचे छुपे सहकार्य मिळत असल्याचे समोर येत आहे. गावात उघडपणे सुरू असलेल्या या अवैध धंद्यांमुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत असून, सामाजिक शांततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. गावाच्या जबाबदार पदावर बसलेल्या व्यक्तींकडूनच कायद्याची पायमल्ली होत असल्याने नागरिकांमध्ये मोठा संताप व्यक्त केला जात आहे. वरिष्ठ पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.
नव्या ठाणेदारांकडून ‘सिंघम’च्या भूमिकेची अपेक्षा आतापर्यंत आलेल्या अनेक ठाणेदारांनी या मुजोर आणि राजकीय पाठबळ असलेल्या अवैध धंदेवाल्यांच्या मुसक्या आवळण्याची हिंमत दाखवली नाही. त्यामुळे, आता आलेले नवे ठाणेदार खरोखर ‘सिंघम’ बनून आपले कर्तव्य पार पाडणार की पुन्हा भ्रमाचा भोपळा फुटणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलिसांनी आता केवळ अधूनमधून धाडी टाकण्याचे ‘नाटक’ न करता, महसूल, पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त मोहीम राबवून या टोळ्यांचा कायमचा बिमोड करावा, अशी मागणी जोर धरत आहे. प्रशासनाने तात्काळ कठोर पावले उचलली नाहीत, तर महिला संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा परिसरातील संतप्त महिलांनी दिला आहे.
