बीबीटोला येथे बिबट्याचा महिलेवर हल्ला; वनविभागाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांचा सवाल
तिरोडा :- तालुक्यातील बीबीटोला परिसरात सोमवारी (3 ऑगस्ट) बिबट्याने एका महिलेवर हल्ला करून तिला गंभीर जखमी केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मागील अनेक दिवसांपासून बीबीटोला परिसरात बिबट आपल्या बछड्यासह वावरत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून सातत्याने दिली जात होती. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांना तसेच या मार्गाने प्रवास करणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. मात्र, संभाव्य धोका लक्षात घेऊनही वनविभागाकडून प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, बिबट्याच्या हालचालींबाबत वारंवार माहिती देऊनही परिसरात गस्त वाढविणे, पिंजरा लावणे किंवा वन्यप्राण्याला सुरक्षितरीत्या जेरबंद करण्यासाठी आवश्यक ती तातडीची कारवाई करण्यात विलंब झाला. अखेर सोमवारी या बिबट्याने महिलेवर हल्ला केल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई सुरू आहे. जखमी महिलेची प्रकृती, तसेच हल्ल्याचे नेमके कारण याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
दरम्यान, परिसरातील नागरिकांनी वनविभागाने तातडीने बिबट्याला पकडण्यासाठी विशेष पथक तैनात करावे, प्रभावित गावांमध्ये सतत गस्त ठेवावी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. वनविभागानेही नागरिकांना एकटे शेतात किंवा जंगलालगतच्या भागात जाणे टाळावे, लहान मुलांवर लक्ष ठेवावे आणि बिबट्याचे दर्शन झाल्यास तातडीने वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
