General

रावणवाडी येथे ढाबा चालकाची धारदार शस्त्राने हत्या..!

 

मध्यरात्रीच्या घटनेने परिसरात खळबळ; पोलिसांकडून तपास सुरू

 

गोंदिया :- तालुक्यातील रावणवाडी येथे दिनांक 19 मेच्या मध्यरात्री दरम्यान ढाबा चालकाची धारदार शस्त्राने हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मृत व्यक्तीचे नाव राजकुमार हरीणखेडे (45) राहणार रावणवाडी असे असून ते गावात ढाबा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मिळालेल्या माहितीनुसार अज्ञात आरोपींनी त्यांच्या डोक्यावर व गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांची निर्घृण हत्या केली.

घटनेची माहिती मिळताच रावणवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी केटीएस सामान्य रुग्णालय, गोंदिया येथे पाठविला. या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रावणवाडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार वैभव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जुन्या वैमनस्यातून ही हत्या झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र पोलिसांकडून अद्याप अधिकृत कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही.

दरम्यान, रावणवाडी परिसरात मागील काही काळात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. यापूर्वीही पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर एका व्यक्तीचा संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. तसेच गरोदर महिलेवर मारहाण झाल्याची घटना देखील समोर आली होती. तसेच अवैधरित्या अमली पदार्थांचे संचार आदी प्रकारांमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

या हत्येच्या घटनेमुळे रावणवाडी परिसरात तणावपूर्ण शांतता असून आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.