धृतराष्ट्राची भूमिका निभावणारे भूमिअभिलेख अधीक्षक?; नागरिकांचा संताप वाढला
राजू फुंडे | तालुका प्रतिनिधी, सालेकसा
सालेकसा : तालुक्यातील उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयात नागरिकांना आवश्यक कामांसाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागत असल्याने सर्वसामान्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दुर्गम व नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळख असलेल्या सालेकसा तालुक्यात जमीन मोजणी, नकाशे, उतारे तसेच इतर भूमिअभिलेख संबंधित कामांसाठी ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या अपेक्षेने कार्यालयात येतात. मात्र कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी अनुपस्थित असल्याचे चित्र वारंवार पाहायला मिळत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, कार्यालयात एखाद-दुसरा कर्मचारी उपस्थित असतो. अधिकारी कुठे आहेत, अशी विचारणा केल्यास “साहेब मोजणीसाठी गेले आहेत” असे उत्तर दिले जाते. त्यामुळे कामासाठी आलेल्या नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत असून त्यांचा वेळ, पैसा आणि श्रम वाया जात आहेत.
सालेकसा येथील नागरिक दिलीप तिवारी यांनी सांगितले की, गेल्या दहा दिवसांपासून ते आपल्या कामासाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र संबंधित अधिकारी भेटत नसल्याने त्यांचे काम प्रलंबित आहे. अशा प्रकारामुळे नागरिकांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप त्यांनी केला.
कार्यालयीन वेळेत अधिकारी व कर्मचारी उपलब्ध नसतील तर सर्वसामान्यांनी आपली कामे कोणाकडे मांडायची, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. भूमिअभिलेख विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कार्यालयातील उपस्थिती, कामकाजाची शिस्त आणि नागरिकांना मिळणारी सेवा याबाबत तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
“कार्यालयात अधिकारी नसतील तर नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा?” असा संतप्त सवाल सालेकसा तालुक्यातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
