विदर्भ

रानमेवा पार्क गिरोला येथे जिल्हाधिकारी मंगेश गोंदावले यांची भेट; लोकसहभागातून साकारलेल्या उपक्रमांचे कौतुक

राजू फुंडे | प्रतिनिधी, सालेकसा :-  तालुक्यातील गिरोला येथे उभारण्यात आलेल्या रानमेवा पार्कला जिल्हाधिकारी मंगेश गोंदावले यांनी भेट देऊन विविध विकासात्मक व पर्यावरणपूरक उपक्रमांची पाहणी केली. निसर्गरम्य वातावरणात विकसित करण्यात आलेल्या या पार्कमधील आंबा, मोह, चिकू, नारळ, काजू तसेच विविध प्रकारच्या फळझाडांचे संवर्धन पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी मुलांच्या शारीरिक विकासासाठी उभारण्यात आलेले ग्राउंड, रनिंग ट्रॅक, खेळण्यासाठी झुले तसेच पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने तयार करण्यात आलेले मियावाकी जंगल यांचीही त्यांनी पाहणी केली. सौरऊर्जेवर चालणाऱ्या सबमर्सिबल पंपाची माहिती घेऊन शाश्वत विकासासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांचे कौतुक केले.

लोकसहभागातून उभारण्यात आलेले मचान, वनसंवर्धनासाठी राबविण्यात येणारे उपक्रम, परिसरातील स्वच्छता व ग्रामस्थांचे पर्यावरणाबाबतचे योगदान पाहून जिल्हाधिकारी गोंदावले यांनी विशेष समाधान व्यक्त केले. ग्रामीण भागातील लोकसहभागातून उभ्या राहिलेल्या अशा उपक्रमांमुळे पर्यावरण संरक्षणासह पर्यटन व सामाजिक विकासालाही चालना मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

या प्रसंगी ग्रामपंचायत गिरोलाच्या सरपंच सौ. रविता विश्वनाथ मेंढे, CFRMC अध्यक्ष मंतुराबाई मरकाम, उपाध्यक्ष योगराजजी फुंडे, तहसीलदार नरसय्या कोंडागुर्ले, नायब तहसीलदार सुतार मॅडम, माजी सरपंच परसरामजी फुंडे तसेच ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गिरोला गावातील रानमेवा पार्क हा पर्यावरण संवर्धन, ग्रामविकास आणि लोकसहभाग यांचा उत्कृष्ट नमुना ठरत असून जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीमुळे या उपक्रमाला नवी प्रेरणा मिळाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.