गुन्हेगारी बातमी

मजीतपूर परिसरात अवैध वृक्षतोड; 40 ते 50 झाडांची कत्तल, वनविभागात खळबळ

गोंदिया:-  मजीतपूर परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध वृक्षतोडीचा प्रकार उघडकीस आला असून जंगलातील सुमारे 40 ते 50 झाडांची बेकायदेशीर कत्तल करून संपूर्ण परिसर साफ करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे वनविभागात एकच खळबळ उडाली असून पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.

स्थानिकांच्या माहितीनुसार, संबंधित भागात मोठ्या प्रमाणावर वृक्षांची तोड करण्यात आली. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणातील अवैध वृक्षतोड होत असताना प्रशासनाचे नियंत्रण दिसून आले नाही. त्यामुळे वनसंपदेचे संरक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या प्रकरणात काही स्थानिकांकडून क्षेत्ररक्षकांसह वनविभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमताबाबत चर्चा होत असल्याचे सांगितले जात आहे. तथापि, या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्याने संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.

पर्यावरणाच्या दृष्टीने ही घटना अत्यंत गंभीर मानली जात असून जंगलातील वृक्षांची मोठ्या प्रमाणावर झालेली कत्तल जैवविविधता, वन्यजीवांचे अधिवास आणि पर्यावरणीय संतुलनासाठी धोकादायक ठरू शकते. वनसंपदेचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशालाच या घटनेमुळे तडा गेल्याचे नागरिकांचे मत आहे.

दरम्यान, या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध वन गुन्हा दाखल करण्यात आला असून विविध कायदेशीर कलमान्वये तपास सुरू असल्याची माहिती क्षेत्ररक्षकांनी दिली आहे. दोषींवर कठोर कारवाई करून भविष्यात अशा प्रकारांना आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

वनविभागाच्या पुढील तपासातून या अवैध वृक्षतोडीमागील नेमके सूत्रधार कोण आहेत, तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबतची माहिती समोर येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.