महाराष्ट्

गोंदिया जिल्ह्यात सारस पक्ष्यांची घटती संख्या चिंतेचा विषय; संवर्धनासाठी विशेष गणना मोहीम

गोंदिया, दि. 20 जून : गोंदिया जिल्ह्यातील सारस पक्ष्यांच्या संवर्धनासाठी प्रशासनाने विशेष पुढाकार घेत जिल्हाभर गणना मोहीम राबविली. पहाटे 4 वाजल्यापासून जिल्हाधिकारी मंगेश गोंदावले व उपवनसंरक्षक पवन कुमार जोंग यांच्या नेतृत्वात हिरवळ संस्था, पक्षीप्रेमी संघटना व वन विभागाच्या पथकांनी डांगुर्ली घाट परिसरासह जिल्ह्यातील 34 महत्त्वाच्या स्थळांना भेट देऊन सारस पक्ष्यांची गणना केली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या जिल्ह्यात सारस पक्ष्यांची संख्या केवळ 31 च्या आसपास असल्याचे समोर आले आहे. वर्षानुवर्षे या पक्ष्यांची संख्या घटत असल्याने पर्यावरणप्रेमी आणि पक्षी अभ्यासकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. प्रेम, निष्ठा आणि पर्यावरणीय समतोलाचे प्रतीक मानला जाणारा सारस पक्षी गोंदिया जिल्ह्याच्या नैसर्गिक वैभवाचा महत्त्वाचा भाग आहे.

वन विभागाने यापूर्वी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विविध जलाशयांमध्ये सारस पक्ष्यांसाठी अनुकूल अधिवास निर्माण करण्याचे प्रयत्न केले आहेत. मात्र डांगुर्ली घाट परिसरातील वाळू उपसा, अधिवासाजवळील मानवी हस्तक्षेप, तसेच शेत परिसरातून जाणाऱ्या विद्युत तारांचे जाळे, विविध किटनाशकांच्या फवारणी यामुळे या पक्ष्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

सारस पक्ष्यांचे संवर्धन व त्यांच्या अधिवासाचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पक्षीप्रेमींकडून होत असून आगामी काळात प्रशासन कोणती पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.