General

२४ लाखांच्या विकासकामांचा दोन महिन्यांत बट्ट्याबोळ! पेवर ब्लॉक उखडले, नाली बांधकामावर प्रश्नचिन्ह

▪️ग्रामसेवकाच्या कारभाराविरोधात ग्रामस्थांचा संताप, उच्चस्तरीय चौकशीची मागणी 

 

संदिप लंजे/लाखांदूर तालुका प्रतिनिधी :- शासनाच्या निधीतून ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या तब्बल २४ लाख रुपयांच्या विकासकामांचा अवघ्या दोन महिन्यांतच फंडाफोड झाल्याने ग्रामपंचायत गुंजेपार-किन्ही परिसरात संतापाची लाट उसळली आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्ती विकास योजनेअंतर्गत करण्यात आलेली फेवर ब्लॉक व सिमेंट काँक्रीट नालीची कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

माहितीनुसार, गुंजेपार येथील बुद्ध विहार परिसरात फेवर ब्लॉक बसविण्यासाठी ६ लाख रुपये, किन्ही येथील समाजमंदिरासमोरील फेवर ब्लॉकसाठी ६ लाख रुपये, तसेच गुंजेपार व किन्ही येथे सिमेंट काँक्रीट नाली बांधकामासाठी प्रत्येकी ६ लाख रुपये असा एकूण २४ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. मात्र कामे पूर्ण होताच काही दिवसांतच फेवर ब्लॉक खचणे, उखडणे, सांध्यांना तडे जाणे आणि नाली बांधकामातही त्रुटी दिसून येत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, विकासकामांमध्ये दर्जेदार साहित्याचा वापर न करता अंदाजपत्रकातील तरतुदींना जाणीवपूर्वक तिलांजली देण्यात आली. प्रत्यक्ष कामे आणि मंजूर अंदाजपत्रक यामध्ये मोठी तफावत असल्याचा आरोप होत असून, सार्वजनिक निधीचा अपव्यय झाल्याची चर्चा गावात रंगली आहे. लाखो रुपयांचा खर्च दाखवून प्रत्यक्षात दर्जाहीन कामे केल्यामुळे शासनाच्या विकास योजनांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या संपूर्ण प्रकरणात ग्रामसेवकाच्या कारभारावरही ग्रामस्थांनी गंभीर आक्षेप नोंदविले आहेत. कामांच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष करून केवळ कागदोपत्री विकास दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप होत आहे. निकृष्ट कामामागे कमिशनखोरीचे साटेलोटे असल्याची शंका व्यक्त केली जात असून, संबंधित अधिकारी व कंत्राटदारांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.

गावातील नागरिकांनी पंचायत समिती, जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनाने तातडीने तांत्रिक पथक पाठवून कामांची प्रत्यक्ष पाहणी करावी, अंदाजपत्रकाची तपासणी करावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच निकृष्ट दर्जाची सर्व कामे संबंधितांकडून पुन्हा करून घेण्यात यावीत, अशीही मागणी पुढे आली आहे.

“२४ लाखांचा निधी खर्च होऊनही दोन महिन्यांतच कामे उखडत असतील, तर हा विकास की निधीचा खेळ?” असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करीत असून, आता वरिष्ठ प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.