General

आदिवासींच्या राष्ट्रीय श्रद्धास्थान कचारगडची सातत्याने उपेक्षा!

– १० वर्षांत विकासनिधीचा एक रुपयाही नाही; विधानसभा अधिवेशनात न्याय मिळणार की पुन्हा आश्वासनांचीच खैरात?

 

राजु फुंडे प्रतिनिधि सालेकसा :- गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यात असलेले कचारगड देवस्थान हे देशभरातील आदिवासी समाजाचे राष्ट्रीय स्तरावरील धार्मिक व सांस्कृतिक श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते. दरवर्षी देशातील १५ ते १६ राज्यांमधून सुमारे १० ते १२ लाख भाविक तसेच परदेशातील संशोधक व अभ्यासक येथे दर्शन व अभ्यासासाठी भेट देतात.

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने सन २०१६ मध्ये कचारगड देवस्थानाला “ब” वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्रदान केला होता. या दर्जाअंतर्गत भक्तनिवास, संग्रहालय, वाचनालय, सांस्कृतिक भवन, संशोधन केंद्र, शौचालय व स्नानगृह आदी सुविधा उभारण्यासाठी प्रथम २२ कोटी रुपये आणि त्यानंतर २१ कोटी रुपयांचे विकास प्रस्ताव जिल्हाधिकारी गोंदिया यांनी शासनाकडे पाठविले होते. मात्र आजपर्यंत या प्रस्तावांना मंजुरी मिळालेली नाही.

नियमांनुसार “ब” वर्ग तीर्थक्षेत्राला दरवर्षी २ कोटी रुपयांचा विकासनिधी मिळणे अपेक्षित आहे. त्या हिशोबाने गेल्या १० वर्षांत किमान २० कोटी रुपयांचा निधी मंजूर होणे आवश्यक होते. मात्र अद्याप एक रुपयाही निधी प्राप्त झालेला नाही.

सन २०१८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री व आदिवासी विकास मंत्र्यांनी कचारगड दौऱ्यादरम्यान १०० कोटी रुपयांच्या विकासनिधीची तसेच देवस्थानाला “अ” वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर सन २०१९ मध्ये जिल्हाधिकारी गोंदिया यांनी “अ” वर्ग दर्जासाठी प्रस्ताव शासनाकडे सादर केला. मात्र आजपर्यंत ना दर्जा मिळाला ना विकासासाठी निधी मंजूर झाला.

आदिवासी विकास विभागाकडे २८ कोटी रुपयांचे विविध विकास प्रस्ताव वेळोवेळी सादर करण्यात आले. मात्र प्रत्येक वर्षी केवळ आश्वासनेच मिळत असल्याची खंत आदिवासी समाजातून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे येत्या विधानसभा अधिवेशनात कचारगड देवस्थानाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस निर्णय होणार का, की पुन्हा एकदा केवळ आश्वासनांचीच पुनरावृत्ती होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे

“कचारगड देवस्थानाच्या विकासासाठी शासनाकडे दरवर्षी निधीची मागणी करण्यात येते. मात्र आजपर्यंत कोणताही ठोस निधी प्राप्त झालेला नाही. निधीअभावी अनेक विकासकामांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. त्यामुळे येथे येणाऱ्या लाखो भाविकांना विविध गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.”

— दुर्गाप्रसाद कोकोडेअध्यक्ष, कचारगड तीर्थक्षेत्र समिती, धनेगाव