गुन्हेगारी बातमी

बेकायदा देशीदारू वाहतुकीवर दिघोरी पोलिसांची धडक कारवाई; ६१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

▪️ मोटारसायकलसह ४० देशी दारूच्या बाटल्या जप्त; आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल

 

संदिप लंजे मुरमाडी:- अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांविरोधात दिघोरी पोलिसांनी प्रभावी कारवाई करत ६१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २६ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास मौजा मुरमाडी येथील हनुमान चौक परिसरात मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पंचांसमक्ष धाड टाकण्यात आली. यावेळी वाल्मीक युवराज पुराम (वय ४३, रा. मुरमाडी, ता. लाखांदूर) हा एमएच-३६/एसी-४१५८ क्रमांकाच्या होंडा साईन मोटारसायकलवरून अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करताना आढळून आला.

कारवाईदरम्यान आरोपीच्या ताब्यातून ९० मिली क्षमतेच्या टायगर बॉन्ड देशी दारूच्या ४० बाटल्या (किंमत १,६०० रुपये) तसेच होंडा साईन मोटारसायकल (किंमत ६०,००० रुपये) असा एकूण ६१,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्ती पंचनामा करून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (अ) व ६५ (ई) अन्वये कायमी गुन्हा क्रमांक १४१/२०२६ दाखल करण्यात आला.

या प्रकरणात पोलिस हवालदार हितेश मडावी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला असून, दाखल अधिकारी पोलीस हवालदार मेश्राम तर पुढील तपास पोलीस हवालदार घनश्याम कोडापे हे करीत आहेत.

दिघोरी पोलिसांनी अवैध मद्यव्यवसाय व वाहतुकीविरोधात कारवाईचा धडाका कायम ठेवला असून, अशा बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी होणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.