अड्याळमध्ये हिंदू-मुस्लिम बांधवांनी जपला सामाजिक सलोखा;मोहरमनिमित्त सर्वधर्म समभावाचे अनोखे दर्शन
अमित रणदिवे /भंडारा; –पवनी तालुक्यातील अड्याळ येथे मोहरमच्या पवित्र पर्वाचे औचित्य साधून सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि सर्वधर्म समभावाचा एक अनोखा संदेश देण्यात आला आहे. चांदशहावली हजरत दर्गा, मासूम शहावली दर्गा व मुस्लिम कौमी एकता कमेटीच्या वतीने येथे मोहरमनिमित्त आयोजित शरबत आणि आलूभात वाटपाच्या कार्यक्रमाने गावकऱ्यांची मने जिंकली. नुकताच २६ जून रोजी सायंकाळी पार पडलेल्या या भव्य दिव्य उपक्रमात दोन्ही समाजाच्या नागरिकांनी एकत्र येत माणुसकीचे दर्शन घडविले.
अड्याळ गावात सलग तिसऱ्या दिवशी या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अड्याळ गावासह परिसरातील असंख्य भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येत शरबत तसेच आलूभाताचा महाप्रसाद ग्रहण केला. या गर्दीने आणि उत्साहाने संपूर्ण परिसरात सलोख्याचे वातावरण निर्माण केले होते.
या उपक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हिंदू, मुस्लिम दोन्ही समाजातील नागरिकांनी खांद्याला खांदा लावून या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आणि व्यवस्थापन सांभाळले. धर्म, जात आणि पंथ या सर्व भिंती बाजूला सारूनमुस्लीम बांधवांसह इतर समाजाच्या ग्रामस्थानी एकत्र येवून काम केल्यामुळे गावात अत्यंत सलोख्याचे आणि एकोप्याचे वातावरण पाहायला मिळाले. “सर्व धर्म समभाव ” हा अत्यंत प्रभावी संदेश या उपक्रमाच्या माध्यमातून समाजाला देण्यात आला.
अड्याळ नगरीत हा स्तुत्य उपक्रम सातत्याने राबविला जात असून उपस्थित ग्रामस्थानी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. अशा प्रकारच्या सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांमुळे समाजात एकमेकांबद्दलचा विश्वास, प्रेम आणि बंधुभाव अधिक दृढ होतो, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. अड्याळ गावकऱ्यांनी जपलेली ही एकतेची परंपरा जिल्ह्यातील गावांसाठी संपूर्ण समाजासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरत आहे.
