सामूहिक वनहक्कधारक ग्रामसभांच्या आमरण उपोषणाचा आठवा दिवस; शासनाचे अधिकारी अद्यापही फिरकले नाहीत
राजू फुंडे | प्रतिनिधी, सालेकसा :- सालेकसा तालुक्यातील सामूहिक वनहक्क प्राप्त ४० ग्रामसभांच्या वतीने विविध न्याय्य मागण्यांसाठी पंचायत समिती सालेकसा येथे सुरू करण्यात आलेल्या आमरण उपोषणाचा आज आठवा दिवस पूर्ण झाला आहे. मात्र, आठ दिवस उलटूनही शासनाचा एकही वरिष्ठ अधिकारी अथवा प्रतिनिधी उपोषण मंडपावर भेट देण्यासाठी आलेला नसल्याने उपोषणकर्त्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.
वनहक्क कायदा २००६ अंतर्गत प्राप्त झालेल्या सामूहिक वनहक्कांची प्रभावी अंमलबजावणी, ग्रामसभांच्या अधिकारांचे संरक्षण तसेच विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी हे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, त्यांच्या सर्व मागण्या संविधानिक आणि कायदेशीर चौकटीत असून त्या शांततामय मार्गाने शासनासमोर मांडण्यात आल्या आहेत. तरीदेखील शासनाकडून कोणताही ठोस प्रतिसाद मिळालेला नाही.
उपोषणस्थळी विविध ग्रामसभांचे पदाधिकारी, सदस्य, महिला व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. आठ दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाची शासनाने अद्याप दखल घेतलेली नसल्याने उपोषणकर्त्यांमध्ये संताप वाढत असून, तात्काळ सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, या आंदोलनाकडे संपूर्ण सालेकसा तालुक्याचे लक्ष लागले असून, शासनाच्या उदासीन भूमिकेबाबत नागरिकांमध्येही तीव्र चर्चा सुरू आहे. आता शासनाचे अधिकारी उपोषणस्थळी कधी पोहोचणार आणि ग्रामसभांच्या मागण्यांवर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
