शैक्षणिक

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी अंतर्गत आश्रमशाळेत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात

देवरी, दि. ३० जून : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, देवरी अंतर्गत येणाऱ्या सर्व 11 शासकीय, 23 अनुदानित, एकलव्य मॉडेल स्कूल व नामांकित आश्रमशाळांमध्ये शैक्षणिक सत्र 2026 – 27 साठी उद्या दि. ३० जून रोजी शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात व आनंददायी वातावरणात साजरा करण्यात येणार आहे.

प्रवेशोत्सवानिमित्त त्या भागातील नेते मंडळी, जिल्हा परिषद,पंचायत समिती, ग्रामपंचायत पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती, विविध आदिवासी संघटनांचे प्रतिनिधी व प्रकल्प कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या विविध आश्रमशाळांमध्ये उपस्थित राहून कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. तसेच आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध विद्यार्थी कल्याणकारी योजनांची माहिती पालक व विद्यार्थ्यांना देण्यात येणार असून प्रवेशोत्सव अधिक प्रभावी व संस्मरणीय होण्यासाठी सहकार्य केले जाणार आहे.

प्रवेशोत्सवासाठी सर्व आश्रमशाळांचा परिसर आकर्षक पद्धतीने सजविण्यात आला असून शाळांची रंगरंगोटी, स्वच्छता व परिसर सुशोभीकरणाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी गुलाबपुष्प, स्वागतगीत, रांगोळी, फुगे तसेच विविध अभिनव उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. काही शाळांमध्ये नवप्रवेशित विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी शालेय दप्तर (स्कूल बॅग) तसेच पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे.

सकाळी विद्यार्थ्यांच्या सहभागातून गावामध्ये प्रभात फेरी काढून शिक्षणाविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. “एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये” या उद्देशाने सर्व शिक्षकांनी दि. २२ जूनपासून पालक संपर्क अभियान राबवून विद्यार्थ्यांनी शाळेच्या पहिल्या दिवसापासून नियमित उपस्थित राहावे यासाठी व्यापक जनजागृती केली आहे.

उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्टीनंतर विद्यार्थ्यांना शाळा हे आपले दुसरे घर वाटावे, आश्रमशाळेबद्दल आपुलकी व अस्मिता निर्माण व्हावी आणि प्रत्येक विद्यार्थी आनंदाने शिक्षणात सहभागी व्हावा, यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी प्रकल्प अधिकारी उमेश काशीद यांनी सर्व पालकांना आवाहन करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेच्या पहिल्याच दिवसापासून नियमित शाळेत पाठवावे. शाळा, पालक आणि समाज यांच्या संयुक्त सहभागातून प्रत्येक बालक गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येईल, असा विश्वास आहे.”