Friday, July 3, 2026
Latest:
महाराष्ट्

रुग्णांना जाणीवपूर्वक खाजगी रुग्णालयात वळविल्यास अधिकाऱ्यांवर थेट कारवाई: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या पुढाकाराने मंत्रालयात झाली महत्त्वाची बैठक 

मागील ६ महिन्यांचा रेफरल डेटा तपासण्याचे निर्देश; कट प्रॅक्टिसला बसणार आळा

तुमसर, साकोली व पवनी उपजिल्हा रुग्णालयांची क्षमता २०० खाटांची करणार

भंडारा:- शासकीय आरोग्य योजनेचा लाभ मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. रुग्णांना जाणीवपूर्वक खाजगी रुग्णालयांकडे वळविणे, कट प्रॅक्टिसला प्रोत्साहन देणे किंवा शासकीय यंत्रणेतील उपलब्ध सुविधांकडे दुर्लक्ष करणे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही, असा सज्जड दम राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिला आहे. अशा प्रकारांमध्ये दोषी आढळणाऱ्या संबंधित अधिकारी, ईएमएस (EMS) समन्वयक आणि कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

जिल्ह्यातील विस्कळीत झालेल्या आरोग्य सेवेच्या तक्रारी वारंवार येत असल्याने आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आरोग्य मंत्र्यांकडे विशेष बैठकीची मागणी केली होती. ही मागणी पूर्ण करत आरोग्य मंत्र्यांनी गुरुवारी सायंकाळी मंत्रालयातील समिती कक्षात एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले होते.

१०८ आणि १०२ रुग्णवाहिकांचा गैरवापर थांबवा

बैठकीत आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या दुरवस्थेकडे मंत्र्यांचे लक्ष वेधले. “शासनाने गरीब रुग्णांसाठी सुरू केलेली १०८ आणि १०२ ही रुग्णवाहिका सेवा काही ठिकाणी रुग्णांना शासकीय रुग्णालयात न नेता खाजगी रुग्णालयात सोडते. यामुळे गरीब रुग्णांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो,” अशी खंत आ. भोंडेकर यांनी व्यक्त केली. यावर आळा घालून रुग्णांना शासकीय किंवा ‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’अंतर्गत मान्यताप्राप्त रुग्णालयातच नेण्यात यावे, जिथे मोफत उपचार मिळतील, अशी मागणी त्यांनी केली.

याची गंभीर दखल घेत मंत्री आबिटकर यांनी मागील ६ महिन्यांचा रुग्णवाहिकांचा ‘रेफरल डेटा’ तपासण्याचे आदेश दिले असून, जिथे अनियमितता आढळेल तिथे कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

जिल्ह्यातील आरोग्य सेवांचा विस्तार होणार

बैठकीत आमदार भोंडेकर यांनी मांडलेल्या विविध मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेताना आरोग्यमंत्र्यांनी पुढील निर्देश दिले:

क्षमता वाढवणे– तुमसर, साकोली आणि पवनी येथील उपजिल्हा रुग्णालयांची क्षमता १०० खाटांवरून २०० खाटांपर्यंत करण्यात येईल.

औषध पुरवठा व यंत्रसामग्री: सर्व शासकीय रुग्णालयांमधील औषधांचा तुटवडा तातडीने पूर्ण केला जाईल आणि रुग्णालयातील अत्याधुनिक यंत्रांची तपासणी करून ती त्वरित सुरू केली जातील.

आशा वर्कर आढावा: जिल्ह्यात संस्थात्मक प्रसूतींचे प्रमाण वाढविण्यासाठी आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, तसेच आशा सेविकांच्या कामांचा नियमित आढावा घेण्यात यावा.

दिरंगाई केल्यास अधिकारी जबाबदार

“शासनाने आवश्यक निधी आणि सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतरही कामात दिरंगाई किंवा निष्काळजीपणा झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल,” असा इशारा मंत्री आबिटकर यांनी दिला. तसेच, दर तीन महिन्यांनी आमदारांच्या उपस्थितीत होणाऱ्या जिल्हास्तरीय आरोग्य आढावा बैठकींना सिव्हिल सर्जन आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी स्वतः उपस्थित राहणे बंधनकारक केले आहे. या बैठकांचे इतिवृत्त थेट शासनाकडे सादर केले जाईल.

बैठकीला प्रमुख उपस्थिती

या महत्त्वपूर्ण बैठकीला आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यासह आमदार महेंद्रशेठ दळवी, आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर, आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवाड, उपसंचालक राजेंद्र भालेराव यांच्यासह आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते. तर भंडारा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संदीपकुमार गजभिये यांच्यासह राज्यातील सर्व जिल्हा शल्यचिकित्सक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीला जोडले गेले होते.