गुन्हेगारी बातमी

सावरी ट्रक चोरी प्रकरणातील आणखी तीन आरोपी रावणवाडी पोलिसांच्या ताब्यात

गोंदिया :- जिल्ह्यातील सावरी बसस्टॉप परिसरात 17 जुलै रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडलेल्या ट्रक चोरी प्रकरणात रावणवाडी पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला यापूर्वी अटक करण्यात आली होती. मात्र, गुन्ह्यात सहभागी असलेले अन्य तीन आरोपी फरार होते. अखेर 30 जुलै रोजी सकाळी रावणवाडी पोलिसांनी सापळा रचून तिन्ही फरार आरोपींना ताब्यात घेतले.

या चोरीत सावरी बसस्टॉपजवळ उभा असलेला ट्रक चोरून त्यामधील सुमारे 30 टन तांदूळ इतरत्र विक्री करण्यात आला होता. त्यानंतर ट्रकही लपविण्यात आल्याने या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी तांत्रिक तपास, गोपनीय माहिती आणि सातत्यपूर्ण शोधमोहीम राबवत आरोपींचा माग काढला.

अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांनुसार चोरीसह विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास रावणवाडी पोलीस करीत आहेत.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, गोंदिया यांच्या देखरेखीखाली पार पडली. पोलीस निरीक्षक रामदास शेवते आणि त्यांच्या पथकाने अत्यंत कौशल्याने व शिताफीने आरोपींना अटक करून गुन्ह्याचा उलगडा करण्यात महत्त्वपूर्ण यश संपादन केले आहे.