अपघात

नागरा येथे भीषण अपघात; बोलेरोला ट्रकची धडक,चिमुकल्या आरूष सहित सहा जणांचा मृत्यू..!

– हैदराबादकडे कामासाठी निघालेल्या मजुरांच्या वाहनाला अपघात; सात जण गंभीर जखमी

 

गोंदिया :- रात्रंदिवस अंगाचे तिळपापड करून कुटुंबाच्या उदरनिर्वाहसाठी परराज्यात जाण्यासाठी निघालेल्या कामगारांवर काळाने घात केला. सदर घटना दिनांक ७ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ११.३० वाजताच्या दरम्यान नागरा परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर बोलेरो आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, बालाघाट जिल्ह्यातील काही कामगार कामाच्या निमित्ताने हैदराबादकडे जाण्यासाठी बोलेरो वाहन क्रमांक MP 15 T 3495 ने बालाघाटहून गोंदियाच्या दिशेने प्रवास करीत होते. नागरा परिसरात त्यांचे वाहन आले असता समोरून अथवा विरुद्ध दिशेने येत असलेल्या MH 35 AJ 2547 क्रमांकाच्या ट्रकने कथितरीत्या भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवून बोलेरोला जोरदार धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की बोलेरो वाहनाचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाला. वाहनामध्ये एकूण १३ प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्घटनेत सहा प्रवाशांचा मृत्यू झाला, तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत.

– सहा जणांचा मृत्यू

अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये आरूश भुमेश्वर मात्रे (वय ३ वर्षे, रा. लांजी), संतोष तिलकचंद मात्रे (वय ३८ वर्षे, रा. किरणापूर), सुशिला संतोष मात्रे (वय ३५ वर्षे, रा. किरणापूर), रूपसेन तेजराज सत्येकर (रा. किरणापूर), ज्योती रूपसेन सत्येकर (रा. किरणापूर) यांच्यासह आणखी एका महिलेचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली आहे. संबंधित मृतांची अधिकृत ओळख व तपशील पोलिसांकडून स्पष्ट करण्यात येत आहेत.

– सात जण गंभीर जखमी

या अपघातात राकेश राजकुमार बाहे (रा. किरणापूर), संतोष वैद्य (रा. लांजी), संगीता भुमेश्वर मात्रे (रा. लांजी), भुमेश्वर धुलीचंद मात्रे (रा. लांजी), राजेंद्र शिवचरण पांचाडे (रा. किरणापूर), लक्ष्मी राजेंद्र पांचाडे (रा. किरणापूर) आणि संदीप रूपलाल बाहे (रा. लांजी) हे गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैभव पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहनातील मृत व जखमी प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम केले. जखमींना तातडीने उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, गोंदिया येथे हलविण्यात आले.

– घटनास्थळी पोलिसांची धाव

अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली. या दुर्घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनीही घटनास्थळी गर्दी करून मदतकार्यात सहभाग घेतला.

दरम्यान, एवढ्या रात्री झालेल्या या भीषण अपघातामुळे नागरा परिसरात शोककळा पसरली आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा का सुटला आणि चालकाकडून निष्काळजीपणा झाला का, याचा तपास गोंदिया ग्रामीण पोलिसांकडून करण्यात येत आहे.

अपूर्ण महामार्गावर वाहतूक सुरू करण्याचा निर्णय कितपत योग्य?

नागरा येथे भीषण दुर्घटनेनंतर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

या भीषण दुर्घटनेनंतर महामार्गाच्या अपूर्ण कामाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. घटनास्थळाची पाहणी केली असता, गेल्या पाच वर्षांहून अधिक काळापासून सुरू असलेल्या महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसल्याचे दिसून येते. मंदिर परिसरातून एकेरी वाहतुकीस सुरुवात होत असताना रस्त्याची रचना आणि बांधकाम अपूर्ण आहे. विशेष म्हणजे वाहनचालकांना दिशा स्पष्ट करणारे पुरेसे सांकेतिक फलक, इंडिकेटर्स अथवा सुरक्षित वळणाची व्यवस्था घटनास्थळी दिसून आली नाही. अशा परिस्थितीत अपूर्ण रस्त्यावरून वाहतुकीला परवानगी कोणत्या आधारे देण्यात आली, हा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. यावेळी उपस्थित नागरिकांच्या मनात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विषयी रोष व्याप्त होता.