बालाघाटमधील आदिवासी बालमृत्यू प्रकरण : पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी राहुल गांधी उद्या गोंदियात
गोंदिया, दि. 30 सप्टेंबर (प्रतिनिधी) – मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील जलगा (बैहर) येथे वैद्यकीय यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे आदिवासी समाजातील चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याच्या हृदयद्रावक घटनेने मानवतेला काळिमा फासला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी स्वतः पीडित कुटुंबीयांना भेटण्याचा निर्णय घेतला आहे.
उद्या, 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:45 वाजता बिरसी विमानतळ, गोंदिया येथे राहुल गांधी यांचे आगमन होणार आहे. येथून ते थेट मध्यप्रदेशातील जलगा गावाकडे प्रयाण करतील. तेथे मृत बालकांच्या आई-वडिलांचे सांत्वन करून, या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणार आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भेटीनंतर सायंकाळी ते पुन्हा गोंदिया विमानतळावरून दिल्लीला परतणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळे बालाघाट-गोंदिया सीमेवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
जिल्ह्यात हाय अलर्ट –
गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या दौऱ्यासाठी चोख बंदोबस्ताचे आदेश दिले आहेत. बिरसी विमानतळ, आमगाव-बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, गुप्तचर यंत्रणाही सतर्क झाली आहे.
