देश-विदेश

चिचाळच्या सुपुत्राची उत्तुंग भरारी; ‘भारत टॅलेंट सर्च’ परीक्षेत लतीस सूर्यवंशी राज्यात प्रथम!

थेट ‘इस्रो’ (ISRO) सहलीसाठी निवड; नाभिक महामंडळाकडून जंगी सत्कार

अमित रणदिवे/भंडारा:- जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर ग्रामीण भागातील विद्यार्थीही शून्यातून आपले विश्व निर्माण करू शकतात, हे भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील चिचाळ येथील लतीस नथू सूर्यवंशी याने सिद्ध करून दाखवले आहे. ‘भारत टॅलेंट सर्च परीक्षा २०२६’ मध्ये इयत्ता सहावीतून त्याने संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या घवघवीत यशामुळे लतीसची थेट ‘इस्रो’ (ISRO) सहलीसाठी निवड झाली असून, त्याच्या या उत्तुंग भरारीने संपूर्ण भंडारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

सामान्य कुटुंबातील असामान्य यश

लतीस हा एका अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा आहे. त्याचे वडील गावामध्ये सलूनचा व्यवसाय करतात, तर आई वनिता सूर्यवंशी शेतीची कामे करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावते. घरात कोणतीही मोठी शैक्षणिक पार्श्वभूमी किंवा सुख-सुविधा नसताना, अशा प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत लतीसने अभ्यासात घेतलेली ही भरारी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. चिचाळ गावातील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या अभ्यासिकेचा लतीसला अभ्यासाचे नियोजन करण्यासाठी मोठा फायदा झाला.

२७ जुलैला ‘इस्रो’कडे प्रयाण

या उल्लेखनीय कामगिरीमुळे लतीसची ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या’ (ISRO) शैक्षणिक सहलीसाठी निवड झाली आहे. आगामी २७ जुलै २०२६ रोजी तो या स्वप्नवत ‘इस्रो’ भेटीसाठी रवाना होणार आहे. शालेय वयातच विज्ञान आणि अंतराळ संशोधन क्षेत्राचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची एक सुवर्णसंधी या निमित्ताने त्याला प्राप्त झाली आहे.

नाभिक महामंडळाकडून जंगी सत्कार

लतीसच्या या ऐतिहासिक यशाची दखल घेत महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या भंडारा जिल्हा पदाधिकाऱ्यांनी चिचाळ गावाला प्रत्यक्ष भेट दिली आणि लतीसचा जंगी सत्कार केला.यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हा अध्यक्ष, प्रमोद मेश्राम, जिल्हा उपाध्यक्ष तारेश मौंदेकर, जिल्हा सचिव,पराग दहीकर , आणि जिल्हा संघटक राजेश नंदपुरे उपस्थित होते.या सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते लतीसचा पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला आणि त्याला पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

शाळा आणि शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन

लतीसच्या या यशामागे त्याच्या शाळेचा आणि शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, चिचाळ येथील मुख्याध्यापिका मंगला गणवीर यांच्या मार्गदर्शनाखाली वर्गशिक्षिका मीनाक्षी फंदे,शिक्षिका सरस्वती काकडे,शिक्षक महेश हिरुडकर,शिक्षक महेश जांभुळे,तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी लतीसला वेळोवेळी प्रोत्साहन दिले आणि त्याची तयारी करून घेतली.

जिल्ह्यात कौतुकाचा वर्षाव

लतीसच्या या यशाने केवळ चिचाळ गावच नव्हे, तर संपूर्ण भंडारा जिल्हा सुखावला आहे. ग्रामीण भागातील एका सामान्य कुटुंबातील मुलाने राज्य पातळीवर मिळवलेले हे यश इतर सर्व विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभासारखे ठरणार आहे. सध्या चिचाळ ग्रामस्थ आणि नाभिक समाज बांधवांकडून लतीसवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.