General

नियोजित बालविवाह थांबविण्यात प्रशासनाला यश

 

गोंदिया :-  दि.20 : दिनांक 19 मे 2026 रोजी अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत कन्हाळगाव या गावात बालविवाह होत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त होताच. जिल्हाधिकारी डॉ. मंगेश गोंदावले. पोलीस अधीक्षक गोरख भामरे आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तुषार पौनिकर यांचे आदेशान्वये आणि मार्गदर्शनात जिल्हा बाल संरक्षण कक्ष , चाईल्ड हेल्पलाइन, इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी गोंदिया, अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशन यांची टीम तयार करून प्राप्त माहितीनुसार होऊ घातलेल्या विवाहातील बालक आणि बालिकेचे जन्म प्रमाणपत्र ग्रामसेवक यांचेकडून प्राप्त करून घेण्यात आले. सदर प्रमाणपत्रानुसार बालकाचे वय 19 वर्ष 11 महिने 24 दिवस बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार पूर्ण नसल्याचे दिसून आले.

त्या अनुषंगाने संपूर्ण टीम कन्हाळगाव येथे सायंकाळी 4.30 वाजता पोहोचले. सरपंच, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, उपसरपंच, आशा वर्कर, ग्रामपंचायत सदस्य, वार्ड बाल संरक्षण समितीचे सदस्य व गावातील इतर पादाधिकारी यांची बैठक घेऊन सदर होणाऱ्या विवाहाबद्दल माहिती देण्यात आली.

मंडप पूजन व हळदीचा कार्यक्रम 26 मे 2026 रोजी आणि 27 मे रोजी सायंकाळी 6.30 वाजता लग्न होत असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांसह महिला बाल विकास विभाग व इंडियन सोशल वेलफेअर सोसायटीच्या टीमने नवरदेव, नवरी व त्यांचे आई वडील आणि नातेवाईक यांना ताब्यात घेऊन सदर होऊ घातलेल्या विवाहातील बालकाचे वय कमी असून बालविवाह प्रतिबंधक 2006 च्या कायद्यानुसार वय पूर्ण नसल्याने गुन्ह्यास पात्र आहे.

बालविवाहमुळे होणारे दुष्परिणाम बालकाला आणि त्यांच्या नातेवाईकांना समजावून सांगण्यात आले. मुलीचे वय 18 आणि मुलाचे वय 21 पूर्ण झाल्याशिवाय लग्न करणार नाही असे हमीपत्र आणि संमती पत्र बालकांच्या आई-वडिलांकडून आणि नातेवाईकांकडून लिहून घेण्यात आले. ‘बालविवाह मुक्त भारत’ या महत्त्वकांक्षी अभियानाची मोहीम सुरू असून ‘बालविवाह मुक्त गोंदिया’ करण्यासाठी आपला संकल्प अभियान सुरू आहे. याप्रसंगी जमलेल्या सर्व लोकांना अशा प्रकारचे बालविवाह होत असल्यास अंगणवाडी सेविका, जवळचे पोलीस स्टेशन, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्पलाइनच्या टोल फ्री क्रमांक 1098 वर संपर्क साधावे असे सांगण्यात आले.

जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन गोबाडे व इंडियन सोशल वेल्फेअर सोसायटीचे जिल्हा समन्वयक ज्ञानेश्वर पटले यांचे नेतृत्वात संपूर्ण कार्यवाही करण्यात आली. सदर होणारा बालविवाह थांबविण्याकरिता जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे संरक्षण अधिकारी मुकेश पटले, भागवत सूर्यवंशी, चाईल्ड हेल्पलाईनचे पूजा डोंगरे, इंडियन सोशल वेल्फेअर सोसायटीच्या दीपमाला भालेराव, हर्ष चव्हाण, अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के, पोलीस उपनिरीक्षक सुशिलकुमार नलावडे, पोलीस हवालदार डोंगरवार आणि खोब्रागडे, पोलीस शिपाई संदीप तुलावी बालविवाह थांबविण्याच्या कार्यवाहीमध्ये सहभागी होते.